...म्हणून अब्जाधीशाची पत्नी परपुरुषासोबत डेटला गेली; पतीनेही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:13 AM2022-02-14T06:13:58+5:302022-02-14T06:14:34+5:30
बॅस्टियन व मॅरिसोल; त्याचं चॅलेंज, तिची ‘डेट’! बॅस्टियन यांनी आपल्या पत्नीबरोबर स्पर्धा तर लावली, पण या स्पर्धेत ते सपशेल हरले. मॅरिसोल निर्विवाद विजेती ठरली.
कोणी कोणाबरोबर डेटला जावं? कुठे जावं? कधी जावं? जावं की नाही? - खरं तर ही ज्याची त्याची वैयक्तिक गोष्ट असली तरी, सध्या एक घटना जगभर मोठ्या चर्चेत आहे. ही कहाणी आहे एका जर्मन अब्जाधीश उद्याेगपतीची आणि त्याच्या पत्नीची. या उद्योगपतीचं नाव आहे बॅस्टियन योट्टा आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे मॅरिसोल योट्टा. घरात पैशांचा महापूर आहे. दोघंही भरपूर एन्जॉय करतात आणि आपल्या मनाप्रमाणं जगताना धंद्यात कोट्यवधी रुपयांची खोट आली, तरी त्यांना त्याची फिकीर नसते. तरीही मॅरिसोल योट्टा एका परपुरुषाबरोबर डेटवर गेली. नुसती डेटवरच गेली नाही, तर तिनं ते जाहीरही केलं. पण त्यामुळेच अनेक प्रश्नही निर्माण झाले. बॅस्टियन आणि मॅरिसोल यांचं पटत नाही का, त्यांचे खटके उडताहेत का, दोघं एकमेकांपासून विभक्त होत, घटस्फोट घेत आहेत का, असेही अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चिले गेले.
...पण असं काहीही नाही. दोघांचं ‘अजूनही’ एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. मग मॅरिसोल का गेली दुसऱ्याबरोबर डेटला? आणखीही एक चक्रावणारी गोष्ट म्हणजे मॅरिसोल त्या परपुरुषाबरोबर नुसती डेटलाच गेली नाही, तर तिनं आपल्यासोबत फक्त कॉफी पिण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीकडून तीन हजार डॉलर्सही घेतले! मॅरिसोलच्या घरात कुबेर पाणी भरत असताना, केवळ तीन हजार डॉलर्ससाठी तिनं दुसऱ्याबरोबर डेटला का जावं? यावरूनही सोशल मीडियावर मोठं वादंग उठलं...मॅरिसोलनं नुकताच या साऱ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. तिचं म्हणणं होतं, मी परपुरुषाबरोबर डेटला गेले, ते माझ्या मर्जीनं. पण त्याला माझ्या नवऱ्याचाही पूर्ण पाठिंबा होता!...त्याचं झालं असं...
दोघा नवरा-बायकोमध्ये काही दिवसांपूर्वीच एक चॅलेंज लागलं, आपल्या दोघांपैकी कोणाला जास्त फॅन्स आहेत? एका महिन्यात सोशल मीडियावर ज्याला सर्वात जास्त फॅन्स मिळतील, तो जिंकला! अर्थात हा प्रस्ताव बॅस्टियनचाच होता. त्याला वाटलं, केवळ जर्मनीतच नाही, अख्ख्या जगात आपलं नाव आहे, हे चॅलेंज आपणच जिंकू...हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी बॅस्टियन आणि मॅरिसोल या दोघांनीही ‘ओन्लीफॅन्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं अकाैंट उघडलं. त्यात तीन अकाैंट्स होती. एक बॅस्टियन यांचं, दुसरं मॅरिसोलचं, तर तिसरं दोघांचं एकत्र. हे अकाैंट सुरू केल्याबरोबर मॅरिसोलनं ‘ओन्लीफॅन्स’ आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाैंटवर धडाधड आपले मादक फोटो टाकायला सुरुवात केली... काही दिवसांतच तिच्या फॅन्सची संख्या लाखांच्या घरात पोहोचली. तिचे हे उत्तान फोटो पाहून एका चाहत्यानं तिला डेटवर बोलावलं.
मॅरिसोलनंही त्याला तत्काळ होकार दिला. पण या कॉफी डेटसाठी तिनं त्याच्याकडे चक्क तीन हजार डॉलर्सची मागणी केली. मॅरिसोलला डेटवर बोलावणारा तिचा चाहताही तितकाच हुशार. त्यानंही त्याचक्षणी तिची मागणी मान्य केली आणि दोघंही डेटवर गेले. ही कहाणी ‘कर्णोपकर्णी’ झाल्यावर तिच्या चाहत्यांची आणि फॅन्सची संख्या आणखी वाढली. बॅस्टियन यांनी आपल्या पत्नीबरोबर स्पर्धा तर लावली, पण या स्पर्धेत ते सपशेल हरले. मॅरिसोल निर्विवाद विजेती ठरली. बॅस्टियननंही याबद्दल मॅरिसोलचं खुल्या मनानं कौतुक आणि अभिनंदन केलं. माझ्यापेक्षा तुझे फॅन कितीतरी जास्त आहेत, हे कबूल करताना, ती जिंकल्याद्दल तिला मोठं गिफ्ट आणि पार्टीही दिली...मॅरिसोलनंही सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम देताना जाहीरपणे सांगितलं, कृपया कोणीही काहीही शंका घेऊ नये. आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं, आहे आणि राहील... आमच्या प्रेमात कोणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही. त्यामुळे आमच्या नात्याबद्दलच्या चर्चा आता बंद करा. मी माझ्या जगप्रसिद्ध अब्जाधीश पतीला हरवलं आहे, एवढंच फक्त लक्षात घ्या!...
बॅस्टियन आणि मॅरिसोल दोघंही एकमेकांना बऱ्याच आधीपासून ओळखत असले तरी, त्यांचं लग्न अतिशय ताजं आहे. कोरोना काळात म्हणजे २०२१ मध्ये त्यांचं लग्न झालं. आपल्या बिनधास्त स्वभावामुळे दोघंही बरेच प्रसिद्ध आहेत. बॅस्टियनचं तर म्हणणं आहे, आमच्या नात्यापुढे मी कशालाही किंमत देत नाही. आयुष्यात हौस, मौज, मनोरंजन हवंच. यासाठी वेळ काढताना, पैसा खर्च करताना मी हात आखडता घेत नाही आणि अशाप्रसंगी व्यवसायात थोडाफार घाटा झाला, नुकसान झालं, तरीही मी त्याला ‘मोजत’ नाही. नातं आपण नाही जपायचं तर कुणी..?
मॅरिसोलचे साडेपाच लाख फॅन्स!
नवऱ्याबरोबरची स्पर्धा जिंकण्यासाठी मॅरिसोलनं आपले ‘ॲडल्ट’ फोटो सोशल मीडियावर टाकले, पण त्याचा तिला दुहेरी फायदा झाला. ती आपल्या अब्जाधीश पतीच्या वरचढ तर ठरलीच, पण यानिमित्तानं एका नव्या व्यवसायाची आणि त्यातून भरपूर पैसा कमावण्याची संधीही तिच्यापुढे दोन्ही हात पसरून स्वत:हून चालत आली. तिचं फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाैंटवरील फॅन्सची संख्या थोड्याच दिवसांत तब्बल साडेपाच लाख इतकी झाली आहे. त्यामुळे ‘सोशल मीडिया मॉडेल’ म्हणून करिअर करायचा निर्णय आता मॅरिसोलनं घेतला आहे.