बहिणीकडून बांधून घेत होता नागांना राखी; तितक्यात भावाच्या पायाला नागाचा दंश अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:13 AM2021-08-23T08:13:15+5:302021-08-23T08:13:34+5:30
१० वर्षांपासून सापांची सुटका करणाऱ्या सर्पमित्राच्या पायाला नागाचा दंश
सारण: बिहारच्या सारण जिल्ह्यात रक्षाबंधनादिवशी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बहिणीला सापांना राखी बांधायला लावणं एका भावाला महागात पडलं आहे. पायाला सापानं दंश केल्यानं मनमोहन नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या १० वर्षांपासून तो विषारी सापांची सुटका करायचा आणि सर्पदंश झालेल्या लोकांवर उपचार करायचा. सारण जिल्ह्यातील मांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
२५ वर्षांच्या मनमोहन आतापर्यंत अनेक विषारी सापांची सुटका केली होती. रविवारी त्यानं दोन नागांच्या शेपट्या हातात पकडल्या होत्या. त्यानं त्याच्या बहिणीला नागांना राखी बांधण्यास सांगितलं. त्यावेळी एका सापानं मनमोहनच्या पायाच्या बोटाजवळ दंश केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात मनमोहन नागांना आपल्या बहिणीकडून राखी बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
नागानं दंश केल्यानंतर मनमोहनच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याची प्रकृती खालावत गेली. त्याला तातडीनं आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सर्पदंशावरील इंजेक्शन नव्हतं. त्यामुळे त्याचे नातेवाईक त्याला छपर येथील रुग्णालयात घेऊन गेले. मात्र या सगळ्यात बराच वेळ गेला. सदर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मनमोहनला मृत घोषित केलं.
सर्पमित्र म्हणून मनमोहन पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. कोणाच्याही घरात साप आढळून आल्यास ग्रामस्थ मनमोहनलाच बोलवायचे. एखाद्याला सर्पदंश झाल्यासही मनमोहनलाच बोलवलं जायचं. मनमोहन मंत्रांच्या माध्यमातून विषाचा प्रभाव संपवून टाकायचा असा ग्रामस्थांचा दावा आहे. मनमोहनच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.