वाट चुकल्यानं दोन दिवस जंगलात अडकला इंजिनीयर; 'असा' सापडला मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:50 PM2019-09-19T16:50:14+5:302019-09-19T16:56:53+5:30
ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका सॉफ्टेवेअर इंजिनिअरचा शोध लागला असून तो सुखरूप आहे. जंगलामध्ये वाट चुकल्यामुळे तो हरवला आणि दोन रात्र त्याला एकट्याला काहीही न खाता फक्त पाणी पिऊन या जंगलात राहावं लागलं.
कर्नाटकातील सुब्रहमण्यच्या जंगलात ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका सॉफ्टेवेअर इंजिनिअरचा शोध लागला असून तो सुखरूप आहे. बंगळुरुमध्ये राहणारा 25 वर्षांचा संतोष बारा जणांच्या ग्रुपसोबत ट्रेकिंगसाठी गेला होता. जंगलामध्ये वाट चुकल्यामुळे तो हरवला आणि दोन रात्र त्याला एकट्याला काहीही न खाता फक्त पाणी पिऊन या जंगलात राहावं लागलं. रविवारी साधारण पाच वाजण्याच्या सुमारास तो वाट चुकला असून त्याला बाहेर येण्यासाठी वाट सापडत नव्हती.
परंतु म्हणतात ना, शोधलं की सापडतं. तसचं काहीसं संतोषच्या बाबतीत झालं. जंगलात वाट शोधत फिरणाऱ्या संतोषला एक पाईपलाईन दिसली. त्याच पाइपलाइनच्या मदतीने मार्ग शोधत संतोष मंगळवारी दुपारी कुक्के सुब्रहमण्य मंदिराजवळ असणाऱ्या कल्लुगुंडी येथील एका व्यक्तीच्या घरी पोहोचला.
द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, खरं तर ट्रेकिंगसाठी निघालेला 12 जणांचा ग्रुप बंगळुरूला आला होता. सर्वजण त्याच दिवशी ट्रेकिंगसाठी जाणार होते. मात्र रात्री खूप झाल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली. चेकपॉईंटपासून कुमारपर्वतापर्यंतचे अंतर साधारण 5 किलोमीटर होते. चेकपॉईंटजवळच सर्वांनी तंबू ठोकला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी सकाळी सर्वजण ट्रेकिंगसाठी निघाले.
ट्रेकिंगसाठी निघाल्यानंतर 12 जणांना दोन ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं होतं. सकाळी सात वाजता ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर ते शिखरावर पोहोचले. त्यानंतर दुपारी तिथेच राहणाऱ्या एका स्थानिकाच्या घरी जेवणासाठी गेले. आपल्या ग्रुपमधील अतर सदस्यांचे जेवण पूर्ण होण्याआधीच संतोषने जेवण आटोपलं आणि ट्रेक ज्या ठिकाणाहून सरू केला होता. त्याठिकाणी ज्याण्यासाठी तो निघाला. पुढे काही अंतर गेल्यानंतर संतोष रस्ता चुकला आणि जंगलामध्ये हरवला. मंगळवारी 45 जणांच्या एका पथकाने संतोषचा शोध घेण्यास सुरुवात केली.
संतोषने आपला अनुभव सांगताना सांगितले की, कदाचित त्या दिवशी माझं नशीब माझ्यासोबत नव्हतं. मी रस्ता चुकलो आहे हे मला समजलं होतं पण योग्य मार्ग सापडेल या आशेने मी पुढे चालत राहिलो. त्याच माझ्या मोबाईलची बॅटरीही संपली होती. माझ्याजवळ खाण्यासाठीही काहीच नव्हतं. वाट शोधत फिरत असताना मला दोन ते तीन सापही दिसले पण माझ्या नशीबाने इतर कोणत्याही जंगली प्राण्यासोबत माझा सामना झाला नाही. शेवटी पुढे जाऊन मला एक पाइपलाइन दिसली आणि घरी जाण्याची आशा माझ्या मनात पुन्हा निर्माण झाली.' पुढे पाइपलाइनच्या मदतीने मार्ग शोधत संतोष मंगळवारी दुपारी कुक्के सुब्रहमण्य मंदिराजवळ असणाऱ्या कल्लुगुंडी येथील एका व्यक्तीच्या घरी सुखरूप पोहोचला.