कारने अचानक घेतला पेट; ब्रिजवरुन खाली घसरताच जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 06:25 PM2024-10-13T18:25:04+5:302024-10-13T18:25:38+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jaipur Burning Car Video : जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी(दि.12) येथे एका कारला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर गाडी चालकाविना ओव्हरब्रिजवरुन खाली आली. यावेळी ब्रिजवरील लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. मात्र, अखेर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कारसह मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सोडाळा परिसरातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना जयपूरच्या सोडाला भागातील आहे. शनिवारी एलिव्हेटेड रोडवर चालत्या कारने अचानक पेट घेतला. कारला आग लागल्यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. कार ओव्हरब्रिजवर चढली होती, पण आग लागल्यानंतर चालकाने गाडीतून उडी घेतली. यानंतर कार घसरत खाली येऊ लागली. जळती कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून ब्रिजवरील अनेकांनी आपल्या गाड्या टाकून पळ काढला. ही आग इतकी भीषण होती की, यात संपूर्ण कार जळून खाक झाली.
Tarzan- The Burning Car😂
— Mumbai Nowcast (@s_r_khandelwal) October 13, 2024
Burning Car, Speeding Through Jaipur Streets
pic.twitter.com/TPFiNtlsJj
हँडब्रेक निकामी झाल्यामुळे कार घसरली
आग लागल्याने कारचा हँडब्रेक निकामी झाल्याचे कार चालकाने सांगितले. हँडब्रेक निकामी झाल्यामुळे गाडीला ब्रेकही लावता आले नाही. ब्रेक फेल झाल्यामुळेच गाडी ब्रिजवरुन खाली घसरू लागली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सुदैवाने अग्निशमन दलाने ही भीषण आग आटोक्यात आणली.