घर विकत घ्या, सोबत पतीही मिळणार मोफत, विचित्र ऑफर पाहून लोक अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:39 PM2022-05-04T12:39:37+5:302022-05-04T12:40:00+5:30
फ्लोरिडा येथील एका महिलेने घर खरेदी करणाऱ्यांना अनोखी ऑफर दिली आहे.
मियामी : अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. फ्लोरिडा येथील एका महिलेने घर खरेदी करणाऱ्यांना अनोखी ऑफर दिली आहे. व्यवसायाने रिअल इस्टेट एजंट असलेल्या या महिलेने घरासह तिच्या माजी पतीला मोफत देण्याची घोषणा केली आहे. तिचा माजी पती घराच्या नवीन मालकासाठी स्वयंपाक, साफसफाई यांसारखी घरातील सर्व कामे करेल, असेही तिने जाहिरातीत सांगितले आहे. महिलेने पतीसह या घराची किंमत जवळपास सात लाख डॉलर म्हणजेच सुमारे पाच कोटी रुपये ठेवली आहे. तसेच पतीसोबत घर खरेदी करण्याची तयारी असल्यास विशेष सवलतही मिळेल. सोशल मीडियात सध्या ही जाहिरात चर्चेत आहे.
४३ वर्षीय महिला क्रिस्टल बॉलने सोशल मीडियावर तिच्या घराचा आणि माजी पतीचा फोटोही शेअर केला आहे. अनेकांनी या डीलमध्ये रस दाखवला आहे. महिलेने दिलेल्या जाहिरातीत तिचा माजी पती घराच्या वेगवेगळ्या भागात छायाचित्रांसाठी पोज देत आहे. क्रिस्टलने सांगितले की सात वर्षांपूर्वी तिचं रिचर्डसोबत लग्न झाले आणि अलीकडेच त्यांचा घटस्फोट झाला आहे.
क्रिस्टल आणि रिचर्ड हे व्यावसायिक भागीदार देखील असून, त्यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोट झाला असला तरीही दोघांच्या नात्यात कोणताही तणाव नाही. परंतु, अजूनही अनेक प्रॉपर्टी आहेत ज्यात दोघेही समान भागीदार आहेत. या कारणास्तव, तिने घर विकण्यासाठी तिच्या माजी पती रिचर्डला देखील पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे. घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी अशी तिची इच्छा आहे.
वेबसाइटवरून जाहिरात काढली
घर खरेदीसाठी जास्त ग्राहक आकर्षित व्हावे यासाठीही खास ऑफर घोषित केल्याचे तिने सांगितले. मात्र, घर विकणारे काही दलाल माजी पतीसह घराच्या विक्रीला विरोध करत आहेत. असे करणे कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. क्रिस्टलने पुढे सांगितले की, तिचे घर विकणारी जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे; कारण काही लोक पॅकेजमध्ये माजी पतीचा समावेश करण्यास विरोध करत आहेत.