शाळेत विद्यार्थिनीने शिक्षिकेवर उगारला हात, शिवीगाळ करत फेकून दिला फोन; नक्की काय घडले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:03 PM2021-11-23T14:03:50+5:302021-11-23T14:09:33+5:30
School Teacher Slapped By Student : गैरवर्तनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शाळा प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला.
कोरोना व्हायरसचा कहर कमी झाल्याने जगभरात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. मुलं शाळेत जायला लागली आहेत, मात्र काही ठिकाणी अशा घटना ऐकायला मिळत आहेत, ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या वर्ग शिक्षिकेवर हात उगारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनानेही कारवाई करण्याचे म्हटले आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, टेक्सासमधील एका शाळेत विद्यार्थिनीने रागाच्या भरात वर्ग शिक्षिकेला मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, संतापलेली विद्यार्थिनी तिच्या जागेवरून उठते आणि तिच्या आईला फोन करण्यासाठी शिक्षिकेच्या डेस्कवर जाते. शिक्षिकेने तसे करण्यास नकार दिल्याने तिने थेट शिक्षिकेवर हात उगारला. यानंतर शिक्षिकेने तिला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले, मात्र संतप्त विद्यार्थिनीने ऐकले नाही.
विद्यार्थिनीने आपल्या आईला फोन करून शिक्षिकेवर 'वांशिक' टिप्पणी केली. एवढेच नाही तर शेवटी संतापलेल्या विद्यार्थिनीने शिक्षिकेवर फोन फेकला आणि वर्गाच्या बाहेर गेली. यावेळी शिक्षिका अतिशय शांत वर्तनात दिसून आल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ वर्गातील एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
“Do you wanna talk to her cuz she’s Black and she’s pissing me off right now” pic.twitter.com/YlBCfeOqhO
— chris evans (@chris_notcapn) November 21, 2021
गैरवर्तनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शाळा प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला. शाळा प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही शिक्षिकाच्या शांत वागण्याचे कौतुक करतो. आम्ही संपूर्ण घटनेत शिक्षिका आणि त्यांच्या प्रतिक्रियेचे जोरदार समर्थन करतो. शिक्षिकेविरुद्ध होणारा छळ, वर्णद्वेष आणि हिंसा सहन करणार नाही. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.