पेट्रोल पंपावर फसवणूक; गाड्यांमध्ये भरलं जातं पाणी, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 07:56 PM2020-01-02T19:56:45+5:302020-01-02T19:57:20+5:30
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत.
नालागड(सोलन)- एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशमधल्या सोलन जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या नालागड शहरात एक भयंकर प्रकार उजेडात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये काही जण बोटल घेऊन पेट्रोल पंपावर गेल्याचं पाहायला मिळतंय, त्यानंतर पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी बोटलमध्ये मशीनमधून पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बोटलमध्ये पेट्रोलच्या ऐवजी पाणी भरलं जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे या पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या आडून पाणी तर विकलं जात नाही ना, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. स्थानिकांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला पेट्रोलच्या ऐवजी मशीनमधून पाणी निघत असल्याची विचारणा केली असता त्यानंही ते मान्य केलं. लोकांनी आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून, पाहता पाहताच तो वाऱ्यासारखा पसरला आहे.
सीएम हेल्पलाइनवर स्थानिकांनी या प्रकराची तक्रार दिली. पेट्रोल पंपवाले पूर्ण पैसे घेत असून, पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे गाड्या खराब होत आहेत. अशा पेट्रोल पंप मालकांविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तसेच त्या पेट्रोल पंप चालकांचा परवाना रद्द केला पाहिजे, अशी मागणी तक्रारकर्त्यानं केली आहे.