अरे बापरे! व्हेजऐवजी चिकन रोल दिला, हॉटेलला थेट एक कोटींची नोटीस पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:15 PM2023-04-20T16:15:11+5:302023-04-20T16:15:28+5:30
एका हॉटेलमध्ये ग्राहकाला व्हेज ऐवजी नॉनव्हेज खायला दिल्याची घटना समोर आली आहे.
आपण हॉटेलमध्ये खाण्यासाठी जात असतो. पण, आपण जर प्युअर व्हेज असेल तर मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. कधी कधी हॉटेलमध्ये चुकून नॉनव्हेजही खायला दिले जाते. त्यामुळे ते खाण्याअगोदर तपासून घेणे गरजेचे असते, अशीच घटना व्हायरल झाली आहे. उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेल्या तरुणासोबत फसवणूक झाल्याच समोर आले आहे. एका तरुणाने हॉटेलमध्ये व्हेज रोलची ऑर्डर दिली, मात्र हॉटेल कर्मचाऱ्याने त्याला व्हेजऐवजी चिकन रोल दिला. चिकन रोल खाताना तरुणाला उलटी झाली. तरुणाची अस्वस्थता वाढली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाने वकिलामार्फत हॉटेल व्यवस्थापनाकडे एक कोटींची भरपाई मागितली आहे.
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; माय-लेकाच्या संवादाचा भावनिक चॅट व्हायरल
हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील फतेहाबाद रोडवर असलेल्या एका हॉटेलशी संबंधित आहे. १४ एप्रिल रोजी गणपती किंग काउंटीमधील रहिवासी अर्पित गुप्ता आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. अर्पितने हॉटेलमध्ये व्हेज रोल्सची ऑर्डर दिली होती. थोड्या वेळाने हॉटेलचे कर्मचारी डिश घेऊन टेबलाजवळ पोहोचले. रोलचा काही भाग खाल्ल्यानंतर त्यात व्हेजऐवजी चिकन रोल असल्याचे आढळून आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यावेळी तरुणाची उलटी झाली. अस्वस्थतेने त्याची प्रकृती खालावली. तेथे उपस्थित ग्राहकाने त्याचा व्हिडिओ बनवला. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
पीडित अर्पित गुप्ता याने बुधवारी वकीलांमार्फत हॉटेल व्यवस्थापनाला नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांनी ग्राहकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि त्यांना असुरक्षित आहार दिल्याचा आरोप केला आहे. वकिलांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी कायदेतज्ज्ञ आणि माजी जिल्हा सरकारी वकील अशोक गुप्ता यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात धार्मिक भावना दुखावणे, अन्न सुरक्षा कायदा आणि भेसळयुक्त पदार्थ खाऊ घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कायद्यानुसार ३ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.