लग्नाच्या १ तासानंतर जोडप्याने मागितला घटस्फोट; कोर्टाने दिला अनोखा सल्ला, सगळेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:30 PM2021-09-14T17:30:11+5:302021-09-14T17:33:24+5:30
पतीने कोर्टात विनंती केली की, आमचं भावनिक नातं तुटलं आहे. मी माझ्या पत्नीसोबत राहू शकत नाही.
बीजिंग – लग्न हे एका जन्माचं नाही तर ७ जन्माचं नातं असतं. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना खूप विचाराअंती निर्णय घेतला. एखाद्या लाईफ पार्टनरसोबत आयुष्य घालवायचं म्हटल्यांवर थोडा वेळ का होईना घ्यायलाच लागतो. परंतु चीनमध्ये जो प्रकार घडलाय तो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नवीन जोडप्यांनी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले.
चीनच्या युन्नान प्रांतातील घटना
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या काही तासांतच घटस्फोट मागण्याचा हा प्रकार चीनच्या दक्षिण प्रांतातील युन्नान येथे घडला. रिपोर्टनुसार, नवरदेव एक कॉलेज स्टुडंट आणि पत्नी ही नर्स आहे. पतीने कोर्टात सांगितले की, आम्हा दोघांचे अफेयर होते. परंतु मी लग्न करु इच्छित नाही. याआधीही आमचं ब्रेक अप झालं आहे. तरीही पत्नीने सतत मेसेज करून मला त्रास दिला. लग्नासाठी पत्नीने माझ्यावर दबाव टाकला. तिच्या दबावापोटी मी लग्न करण्यासाठी तयार झालो परंतु आता मला आझाद करा असं त्याने सांगितले.
पत्नीने मागितले ३४ लाख पोटगी
पतीने कोर्टात विनंती केली की, आमचं भावनिक नातं तुटलं आहे. मी माझ्या पत्नीसोबत राहू शकत नाही. त्यामुळे कोर्टाने आम्हाला वेगळं होण्याची परवानगी द्यावी. तर पत्नीने कोर्टात दावा केला की, पतीने जाणुनबुजून लग्न करुन माझा विश्वासघात केला. त्यासाठी पतीकडून ३ लाख युआन म्हणजे ३४ लाख ३० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कोर्टात केली.
कोर्टाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळला
पती-पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाने कोर्ट चक्रावले. कोर्टाने सांगितले की, पती-पत्नी यांच्यातील भावनिक नातं संपलं आहे हे सिद्ध करू शकले नाहीत. त्यासाठी या दोघांचा घटस्फोट अर्ज फेटाळण्यात येत आहे. इतकचं नाही तर कोर्टाने दोघांना हनीमूनसाठी जा असा सल्ला देत याचिका फेटाळून लावली आहे.
लग्न हा सन्मानाचा विषय
पती-पत्नी दोघांमधील लग्न आणि घटस्फोट ही बातमी चीनच्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटिझन्स म्हणतात की, लग्न करणे हा एक सन्मानाचा विषय आहे. हा लहान मुलांचा खेळ नाही. तर अनेकांनी खटल्याच्या नादाला लागण्याऐवजी एकमेकांना समजून घ्या असा सल्लाही दिला आहे.