नूडल्सच्या दोन हजार पॅकेट्सपासून तयार केलं त्याने छोटसं घर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:36 PM2019-09-12T14:36:22+5:302019-09-12T14:42:01+5:30
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या प्लेहाउसचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मीडिया हाऊसने हे घर तयार करणाऱ्या झांग यांचा शोध घेतला.
नूडल्सचा वापर सामान्यपणे सगळेजण खाण्यासाठी करतात. पण चीनच्या एका व्यक्तीने नूडल्सचा वापर फारच वेगळ्या कामासाठी केला. ही व्यक्ती लवकरच बाबा होणार असून त्याने त्याच्या होणाऱ्या बाळासाठी २००० पॅकेट्स नूडल्सपासून एक छोटं घर तयार केलं आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या प्लेहाउसचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मीडिया हाऊसने हे घर तयार करणाऱ्या झांग यांचा शोध घेतला. झांग यांनी सांगितले की, त्यांनी हे प्लेहाऊस एक्स्पायर झालेल्या नूडल्सपासून तयार केलंय. नूडल्सचा वीटेसारखा वापर करत त्यांनी त्या गोंदाने चिकटवल्या आहेत.
झांग यांनी तयार केलेल्या घरात खिडकी, दरवाजे आणि एक सिंगल बेडही आहे. झांग म्हणाले की, 'माझा एक मित्र फूड प्रॉडक्टचा होलसेलर आहे. त्याच्याकडे हे एक्स्पायर झालेले नूडल्स पडलेले होते. तो हे फेकणार होता. पण मी त्याला असं करण्यापासून रोखलं. मी २ हजार नूडल्सचे पॅकेट एका बिल्डींग मटेरिअलसारखे वापरत घर तयार केलं'.
हे प्लेहाऊस १ मीटर रूंद आणि २ मीटर लांब आहे. हे पूर्ण ४ स्क्वेअर मीटरमध्ये तयार करण्यात आलं. या वयस्क व्यक्ती आरामात यात झोपू शकते. तसेच यात खिडकी आणि लाइट्सही लावण्यात आले आहेत.
काही लोकांनी झांग यांच्या या घराचं कौतुक केलं तर काही लोकांनी टिका केली. लोक म्हणाले की, नूडल्स एक्स्पायर झालेले आहेत. अशात बाळाने हे खाल्ले तर समस्या होऊ शकते. तसेच काही म्हणाले की, या खराब झालेल्या नूडल्समुळे कीडे आणि आजारही होऊ शकतात.