बोंबला! १० मिनिटांपूर्वीच ड्रायव्हिंग टेस्ट पास करून आला अन् कार घेऊन थेट नदीत गेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:03 PM2020-03-04T13:03:26+5:302020-03-04T13:18:15+5:30
एक व्यक्ती ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतर कार चालवत पुलावरून जात होती. दरम्यान त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि कारसहीत तो नदीत कोसळला.
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला आधी टेस्ट द्यावी लागते. चीनमधील एका व्यक्तीनेही अशीच टेस्ट दिली. त्यानंतर १० मिनिटांमध्ये त्याने असा काही कारनामा केला की, त्याला टेस्टमध्ये नापासंच करावं लागेल. मेट्रो यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या Guizhou प्रांतातील Laoping Bridge जवळ ही घटना घडली.
एक व्यक्ती ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतर कार चालवत पुलावरून जात होती. दरम्यान त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि कारसहीत तो नदीत कोसळला. Zhang असं या नवोदित ड्रायव्हरचं नाव आहे. त्याने सांगितले की, ड्रायव्हिंग करताना तो ड्रायव्हिंग टेस्ट पास केल्याचे आलेले अभिनंदनाचे मेसेज वाचत होता. याच नादात तो कारसहीत नदीत कोसळला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो कसा नदीत कोसळला हे दिसत आहे. कार पाण्यात बुडत असताना सुदैवाने Zhang बाहेर येण्यात यशस्वी ठरला. त्याने सांगितले की, 'जेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो. तेव्हा मी मोबाइलवर काही मेसेज वाचत होतो. दरम्यान पुलावरून काही लोक येत होते'.
त्याने पुढे सांगितले की, 'मी घाबरलो होतो आणि एकाएकी डावीकडे वळलो. नशीबाने कार काही वेळ पाण्यावर तरंगत होती. पण मला कारचा दरवाजा उघडता येत नव्हता. अशात दुसरा दरवाजा लात मारून उघडला. जर हा दरवाजा उघडला नसता तर मी बाहेर येऊ शकलो नसतो. मला बाहेर येण्यास काही स्थानिक लोकांनीही मदत केली'.
दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीची कार पाण्यातून बाहेर काढली. त्यांनी सांगितले की, ही कार नुकतीच रजिस्टर केली होती. पण पोलिसांनी या व्यक्तीला दंड ठोठावला की नाही याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. पण इतकं नक्की की, त्याचं लायसेन्स काही महिन्यांसाठी रद्द नक्कीच केलं असावं.