आरारा खतरनाक! ना पैसे, ना कोणता माल; तब्बल १७ लाखांची चॉकलेट्स घेऊन चोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 03:50 PM2022-08-17T15:50:33+5:302022-08-17T15:52:30+5:30
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ मधून एक अनोखी घटना समोर आली आहे.
लखनौ : उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ (Lucknow) मधून एक अनोखी घटना समोर आली आहे. लखनौ मधील चिन्हाट (Chinhat) येथील देवराजी विहार परिसरात ही घटना घडली आहे. इथे चोराने पैसे किंवा इतर कोणत्या वस्तूंची चोरी केली नसून चक्क लाखो रूपयांची चॉकलेट्स लंपास केली आहेत. चोरी झालेल्या चॉकलेट्सची किंमत तब्बल १७ लाख रूपये असल्याचे बोलले जात आहे. चोरट्यांनी घर फोडून गोडाऊनमध्ये ठेवलेले सुमारे १७ लाख रुपये किंमतीचे चॉकलेट्स चोरून नेल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लखनौ मधील कॅडबरी गोडाऊनमधून (Cadbury godown) १७ लाख रूपयांच्या चॉकलेट्सची चोरी झाली आहे. कॅडबरी वितरक करणाऱ्या राजेंद्र सिंग यांनी सांगितले, आम्ही चिन्हाट पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तसेच कोणाला घटनेची अधिक माहिती मिळाल्यास कळवावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Lucknow, UP | Chocolates worth Rs 17 lakh stolen from a Cadbury godown
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 17, 2022
We've filed an FIR in the Chinhat police station. If anyone has any input, please guide us: Rajendra Singh Sidhu, Cadbury distributor pic.twitter.com/u2JrOSKPtW
लाखो रूपयांच्या चॉकलेटची चोरी
व्यावसायिक राजेंद्र सिंग आपल्या पत्नीसोबत लखनौमधील ओमेक्स या भागात राहतात. याआधी चिन्हाटमध्ये राहत होते मात्र त्यांनी चिन्हाटच्या घराचे रूपांतर गोडाऊनमध्ये केल्यानंतर ते ओमेक्स येथे राहण्यासाठी आले. या सर्व घटनेची माहिती शेजाऱ्यांनी दिल्याचे ते सांगत आहेत. चोरीची माहिती मिळताच त्यांनी चिन्हाट येथील गोडाऊनकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत चॉकलेट्स गायब झाले होते. राजेंद्र सिंग घरात नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराबाहेर लोडर लावले आणि त्यात लाखो रुपये किमतीची चॉकलेट्स भरून पळ काढला. याशिवाय त्यांची ओळख पटू नये म्हणून गोदामात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR) देखील आपल्या सोबत नेला.