कोरोना से डर नहीं लगता साहब, पंखे से लगता है! रुग्णाचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 08:59 AM2021-04-27T08:59:54+5:302021-04-27T09:00:58+5:30
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला वाटतेय रुग्णालयातील पंख्याची भीती
छिंदवाडा: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रुग्णालयातील परिस्थिती विदारक आहे. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा रुग्णालयातही असाच एक प्रकार घडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णानं त्याची समस्या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. या व्हिडीओत तरुण रुग्ण वॉर्डमध्ये असलेल्या एका पंख्याची तक्रार करताना दिसत आहे. कोरोना से डर नहीं लगता साहब, फॅन से लगता है, अशी दबंग स्टाईल तक्रार या तरुणानं व्हिडीओमध्ये केली आहे. या तरुणाच्या डोक्यावर असलेला पंखा एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा लवकरात लवकर बदलण्यात यावा, अशी मागणी या रुग्णानं केली आहे.
There is bigger worry for this patient! Bigger than Corona! He is scared of the Fan ! Help him Hospital Staff ! Please. pic.twitter.com/gGaXsdSDRM
— Teji (@Teji62688232) April 26, 2021
रुग्णानं रेकॉर्ड केलेला व्हिडीओ २ मिनिटं १८ सेकंदांचा आहे. यामध्ये रुग्णांनी भरलेला वॉर्ड दिसत आहे. त्यानंतर तरुणानं व्हिडीओमध्ये त्याच्या डोक्यावर असलेला पंखा दाखवला आहे. हा पंखा एका जागी न राहता तो एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा कधीही खाली पडेल अशा स्थितीत आहे. कोरोनाची भीती नंतर, मला त्याआधी या पंख्याची भीती वाटते. कोरोनाच्या आधी हा पंखाच माझा जीव घेईल, असं वाटतं, अशी व्यथा या तरुणानं मांडली आहे.
'मित्रांनो, हा मी आहे. मी छिंदवाडा जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात ऍडमिट आहे आणि हा माझ्या डोक्यावरील पंखा आहे, ज्याला पाहून मला भीती वाटते,' असं तरुणानं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. एक तर पंखा बदला किंवा माझी जागा बदला, मला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा, अशी विनंती मी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे केली. पण काहीच उपयोग झाला नाही, अशी तक्रार या रुग्णाची आहे. 'मित्रांनो, सांगा आपण काय बदलायचं, हा पंखा, हा बेड, या रुग्णालयातील कर्मचारी की सरकार?' असा मिश्किल प्रश्न त्यानं व्हिडीओच्या शेवटी उपस्थित केला आहे.