CoronaVirus: बाळाच्या आठवणीत आईच्या डोळ्यात पाणी; महिला पोलिसाच्या मातृत्वाची संघर्ष कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 03:12 PM2020-04-12T15:12:15+5:302020-04-12T15:31:49+5:30
ही पोस्ट काळजाला भिडणारी आहे. महिला पोलीसाच्या पतीने ही भावनीक पोस्ट लिहीली आहे.
कोरोना व्हायरस जगभरासह भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे हे संकट वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत पोलीस, वैद्यकिय कर्मचारी यांसारखे अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक सर्वसामान्यांसाठी झटत आहेत. गोरगरीबांसाठी कधी देवदूत तर कधी अन्नदाता बनून लोकांना मदत करत पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.
रात्रंदिवस राबत असलेल्या पोलीसांमध्ये पुरूषंच नाही तर महिलांचा सुद्धा समावेश आहे. आपलं घर, संसार सांभाळत महिला पोलीस कर्मचारी आपल्या कामावर हजर होत आहेत. अशीच एक फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला पोलीसाच्या पतीने ही भावनीक पोस्ट लिहिली आहे.
अमोल गव्हाणे नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली आहे. ''आज एक महिना झाला. माझी बायको माझ्यापासून दूर आहे. २४ तास उन्हात तसंच रात्रभर कडक बंदोबस्त करत आहे. काल अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं, मी विचारलं तर पाय दुखत आहेत. असं म्हणाली. पण मला समजलं की मुलाच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले आहे. परिस्थितीने सुद्धा परीक्षा घ्यायची ठरवलं आहे. पण बायको तुला मी शब्द देतो की हे संकट संपल्यानंतर तुला आणि मुलाला कुठेतरी फिरायला घेऊन जाईन. सलाम तुझ्या कार्याला'' असा संदेश हतबल झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीसाठी फेसबूकच्या माध्यमातून दिला आहे.
त्यानंतर या व्यक्तीने लोकांना घरी थांबण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे. मित्रानों कृपया घरातच थांबा, कारण तुमच्या घरात थांबल्याने एका आईला तिच्या मुलाला लवकर भेटता येईल. अशाप्रकारे या व्यक्तीने लोकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.