Threat to Dalit Family: दलित मुलाने मंदिरातील देवाच्या मूर्तीला लावला हात, कुटुंबीयांना ठोठावला मोठा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 07:33 PM2022-09-21T19:33:50+5:302022-09-21T19:34:31+5:30
देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते, मात्र सध्या अशाच एक घटनेने खळबळ माजली आहे,
नवी दिल्ली : देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते. मात्र अस्पृश्यतेच्या अशा घटना नेहमी समोर येत असतात. सध्या अशीच कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दलित मुलाने मंदिरातीलहिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला. यानंतर पुन्हा गदारोळ झाला आणि मुलाच्या कुटुंबाला तब्बल साठ हजारांचा जबर दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. इथे एका दलित कुटुंबाला साठ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खरं तर एका दलित मुलाने हिंदूच्यामंदिरात प्रवेश करून मूर्तीला स्पर्श केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालूर तालुक्यातील हुल्लेरहल्ली गावात ही मिरवणूक निघणार होती, त्याचवेळी मुलाने तिथल्या मूर्तीला स्पर्श करून ती उचलण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला आणि त्यांना खटकला. ही मूर्ती उत्सवासाठी तयार करण्यात आली होती.
पंचायचीने ठोठावला दंड
घटनेनंतर तेथील उपस्थित ग्रामस्थांनी प्रथम त्या मुलाला हुसकावून लावले आणि नंतर हे प्रकरण स्थानिक पंचायतीपर्यंत पोहोचले. पंचायतीने आपल्या आदेशात मुलाच्या कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. जोपर्यंत दंड भरला जात नाही तोपर्यंत संबंधित मुलगा गावात येऊ शकत नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही लोकांनी संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना फोनवरून धमकी दिली आहे.