आमीर खानने खरंच गव्हाच्या पीठातून गरजूंना १५ हजार रुपयांची मदत केलीय?... जाणून घ्या पूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 12:29 PM2020-04-28T12:29:29+5:302020-04-28T12:39:17+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते आणि सेलिब्रिटीज आपलं योगदान देत आहे. अभिनेता अक्षयकुमारने चक्क २५ कोटी रुपयांची मदत पंतप्रधान फंडात देऊ केली आहे.
मुंबई - देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन केल्याने गरिब-मजूर आणि स्थलांतरीत कामगार वर्गाचे मोठे हाल होत आहेत. या कामगार आणि भुकेल्यांसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. सरकारकडूनही या गरिबांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. तर, राजकीय पक्षांकडूनही मदत होत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वचजण आपापल्या परीने गरिबांना उपाशीपोटी न झोपू देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर अशा मदतीचे कित्येक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. त्यातच, अभिनेता आमीर खानने २ किलो गव्हाच्या पीठातून १५ हजार रुपयांची मदत गरिबांना केल्याचं सांगण्यात येत आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते आणि सेलिब्रिटीज आपलं योगदान देत आहे. अभिनेता अक्षयकुमारने चक्क २५ कोटी रुपयांची मदत पंतप्रधान फंडात देऊ केली आहे. तर, शाहरुख खाननेही आपलं योगदान दिलंय. सलमान खाननेही आपल्या इंडस्ट्रीतील कामगारांची काळजी करत, आपण भाईजान असल्याचं दाखवून दिलंय. त्यातच, अभिनेता आमीर खानने गरिबांना कशी मदत केली, आमीरने खरे गरिब आणि गरवंत कसे शोधले याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यांसदर्भात टिकटॉकवर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे ही माहिती देण्यात येत होती. आमीर खानने, एका ट्रकमध्ये गव्हाच्या पिठाचे २ किलोच्या पिशव्या ठेवल्या होत्या. ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्या घरी जेवण बनत नाही, अशा गरजूंनी येऊन हे पीठ घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या पिशवीतील पीठात ५०० रुपयांच्या नोटाही होत्या. खऱ्या गरिबांना ही मदत देण्याची आमीरची हटके स्टाईल, असे सांगून मेसेज व्हायरल झाला होता. मात्र, अनेकांनी ही आमीरची मदत नसून ही फेक वार्ता असल्याचं म्हटलंय.
आमीर खानने आत्तापर्यंत दान केलेल्या वस्तू किंवा रकमेची कधीही प्रसिद्धी केली नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही त्याबाबत आमीरने कधीच काही सांगितले नाही. मात्र, यासंदर्भात मीडियाने आमीर खानच्या टीमसोबत संपर्क साधला असता, आमीरच्या टीमने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. जर आमीरने खरंच मदत दिली असेल तर तो सांगत का नाही, किंवा मदत केल्याचे सांगायचे नाही, अशी आमीरची भावना आहे का? हेही प्रश्न आणि ते १५ हजारांचं कोडं अद्याप कायम आहे. दरम्यान, आमीर खान सध्या आपल्या कुटुंबासमवेत सेल्फ आयसोलेशनमध्ये घरातच आहेत.