'बचपन का प्यार' गाणाऱ्या सहदेवला खरंच मिळाली २३ लाखांची कार? जाणून घ्या नेमका प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:15 PM2021-08-12T12:15:28+5:302021-08-12T12:18:26+5:30
एमजी हेक्टर कंपनीनं सहदेवला २१ लाखांची कार भेट दिल्याची चर्चा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
छत्तीसगडमधील १० वर्षांच्या सहदेव दिर्दोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. सहदेवच्या 'बचपन का प्यार' गाण्याचं सर्वांकडून कौतुक होत आहे. सहदेवचं गाणं इतकं लोकप्रिय होईल असा विचार कोणीही केला नव्हता. एका गाण्यामुळे सहदेव सोशल मीडियावर सुपरहिट झाला. अनेकांनी त्याचं कौतुक केलं. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीदेखील त्याची भेट घेतली.
सहदेवचा आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच समोर आला. सहदेवला २३ लाख रुपयांची कार भेट देण्यात आल्याची चर्चा झाली. सहदेवचा हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत सहदेव MG ZS EV facelift कारसमोर उभा आहे. सहदेवच्या शेजारी एमजी हेक्टरचे शाखा व्यवस्थापक दिसत आहेत. त्यांच्याकडून सहदेवचा सन्मान करण्यात आला आहे.
या व्हिडीओत पुढे एमजी हेक्टर शोरूममधील सेल्सगर्ल सहदेवच्या हाती चावी देते. त्यामुळे सहदेवला एमजी हेक्टरकडून कार भेट देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र तसं काहीही घडलेलं नसल्याची माहिती आता पुढे आलेली आहे. सहदेवला कार नव्हे, तर २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'सहदेवला आम्ही कार दिलेली नाही. तर त्याला २१ हजारांचं बक्षीस देण्यात आलं,' असं एमजी कंपनीच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं.
सहदेवच्या बचपन का प्यार गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. रॅपर बादशाहनं बचपन का प्यारची एक सीरिज लॉन्च केली. त्यात सहदेव प्रमुख भूमिकेत आहे. यामध्ये बादशाहसह गायिका आस्था गिल आणि संगीतकार रिकोचा सहभाग आहे. सहदेवचं व्हायरल झालेलं गाणं त्यानं २०१९ मध्ये गायलं होतं. त्यानं त्याच्या वर्गात हे गाणं गायलं. ते त्याच्या शिक्षकांनी चित्रीत केलं होतं.