"मी पण माणूस आहे, माझे हक्क आहेत", तरूणीच्या व्हायरल ट्विटनंतर फडणवीसांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:50 PM2023-10-19T16:50:11+5:302023-10-19T16:52:35+5:30

मुंबईत घडलेल्या घटनेमुळे फडणवीसांना हे ट्विट करावे लागले

Disabled Mumbai bride carried up 2 floors at Registrar Office Devendra Fadnavis apologizes | "मी पण माणूस आहे, माझे हक्क आहेत", तरूणीच्या व्हायरल ट्विटनंतर फडणवीसांनी मागितली माफी

"मी पण माणूस आहे, माझे हक्क आहेत", तरूणीच्या व्हायरल ट्विटनंतर फडणवीसांनी मागितली माफी

Devendra Fadnavis says Sorry to disabled bride :  सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे अपंगांसाठी अनुकूल असावीत असा संकेत असतो. जिथे ती सुविधा नाही तेथे नव्याने काही गोष्टी इन्स्टॉल करून घेता येतात. मेट्रो स्थानकांपासून अनेक सरकारी संस्थांमध्ये यासाठी सुविधा आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही या संबंधी अडचणी येत आहेत. या देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी सेवा मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत एका दिव्यांग मुलीला व्हीलचेअरवर बसलेल्या अवस्थेत उचलून दोन जिने वर न्यावे लागले. याबद्दलची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी संताप आणि निराशा व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: गैरसोयीबाबत माफी मागितली. 

विराली मोदी नावाच्या मुलीने ट्विटरवर पोस्ट केली, "मी अपंग आहे आणि माझे लग्न खार मुंबईतील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झाले. ऑफिसमध्ये लिफ्ट नव्हते. ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होते. माझे लग्न होते आणि अधिकारी लोक स्वाक्षरीसाठी खाली येत नाहीत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर स्वाक्षरीसाठी मला दोन मजल्यापर्यंत नेले गरजेचे होते. त्यामुळे मला दोन मजले वर व्हीलचेअर उचलून नेण्यात आले." मुलीने बुधवारी ही पोस्ट लिहिली. महिलेने पुढे सांगितले, "कार्यालयातील पायऱ्या गंजलेल्या असून तिच्या अपंगत्वाची माहिती अधिकार्‍यांना देऊनही तिला कोणतीही मदत करण्यात आली नाही. लग्नासाठी कार्यालयात नेत असताना पायऱ्यांवरून खाली पडली असती तर काय झाले असते?, असा सवालही विराली यांनी केला.

"पायऱ्या अतिशय उंच होत्या आणि हँडरेल्स सैल आणि गंजलेल्या होत्या. भेटीपूर्वी मी माझ्या एजंटला माझ्या अपंगत्वाची माहिती दिली होती तरीही कोणीही मला मदत केली नाही किंवा माझ्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. माझ्या देशाचे सरकार आणि नागरिक माझे अपंगत्व स्वीकारू शकत नाहीत याबद्दल मी निराश आहे. या अग्निपरीक्षेने माझा मानवतेवरचा विश्वास उडाला आहे. मी कुणी वस्तू नाही की ज्याला दोन मजल्यांवर नेले पाहिजे. मीदेखील एक माणूस आहे आणि माझे हक्कही महत्त्वाचे आहेत," असेही विराली यांनी लिहिले.

विरालीचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत माफी मागितली. "सर्व प्रथम नवीन सुरुवातीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांना खूप आनंदी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा! तसेच तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. मी वैयक्तिकरित्या दखल घेतली आहे आणि मी आवश्यक त्या सुधारणा आणि योग्य ती कारवाई नक्की करीन," असे फडणवीसांनी ट्विटमध्ये आश्वासन दिले.

Web Title: Disabled Mumbai bride carried up 2 floors at Registrar Office Devendra Fadnavis apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.