मालकाच्या मृत्यूनंतर नशेत बुडाला, आठवडाभर बेशुद्ध ठेवून सोडवली गेली श्वानाची नशा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:04 AM2023-04-14T10:04:43+5:302023-04-14T10:06:45+5:30
एखाद्या प्रिय व्यक्तीपासून वेगळं झाल्यानंतर किंवा त्या व्यक्तीची साथ सुटल्यानंतर एखाद्यानं नशेच्या आहारी जाऊन स्वत:चा नाश केला असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
एखाद्या प्रिय व्यक्तीपासून वेगळं झाल्यानंतर किंवा त्या व्यक्तीची साथ सुटल्यानंतर एखाद्यानं नशेच्या आहारी जाऊन स्वत:चा नाश केला असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण मालकाच्या मृत्यूनंतर मद्यधुंद झालेल्या श्वानाला तुम्ही कधी पाहिलंय का? अशीच एक घटना ब्रिटनमध्ये समोर आली आहे. कोको नावाच्या एका लॅब्राडोर क्रॉस ब्रीडच्या श्वानाला व्यसन दारूचं लागलं आणि त्याची प्रकृती बिघडली. यादरम्यान त्याला अन्य समस्याही उद्भवू लागल्या. त्याला उपचारासाठी प्लायमाउथ येथील ॲनिमल शेल्टर येथे आणलं असता ही बाब उघडकीस आली.
एका फेसबुक पोस्टमध्ये, ॲनिमल शेल्टरनं या श्वानाची घडलेली गोष्ट सांगितली आहे. कोकोसोबत आणखी एक श्वानालाही त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं, जो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाण, कोको गंभीररित्या आजारी होता आणि २४ तास काळजी घेणं आवश्यक होतं. हे स्पष्ट होते की त्याला दारूच्या नशेकडे लक्ष वेधणारी लक्षणं होती. त्याच्या आरोग्याचा धोका कमी करण्यासाठी त्याला ४ आठवडे बेशुद्ध ठेवावं लागलं.
कशी लागली सवय?
दरम्यान, त्याला याची सवय कशी लागली याची माहिती समोर आलेली नाही. याला दारूची सवय कशी लागली हे कोणालाही माहित नाही, परंतु आमच्या देखरेखीशिवाय तो वाचू शकला नसता, असंही पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान, मालकाच्या मृत्यूनंतर कोकोच्या अवस्थेची ही कहाणी ऐकून सोशल मीडियावर प्राणीप्रेमींचे मन दु:खी झालं आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.