धरणात स्टंटबाजी करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:06 PM2022-07-16T12:06:45+5:302022-07-16T12:07:54+5:30
राजकोटमधील तरूणाला धरणाच्या पाण्यात कारचा स्टंट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
राजकोट- राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. पावसामुळे नाले, ओढे यासह मोठमोठी धरणे तुडूंब भरून वाहत आहेत. मात्र यापासून दूर राहील ती तरुणाई कसली, अनेक तरुण पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी करण्यासाठी हजेरी लावतात. गुजरात मधील राजकोट येथील न्यारी धरणात धोकादायक कार स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याशिवाय अन्य दोन जणांचा देखील तपास सुरू आहे. १२ जुलै रोजी या तरूणाने पाण्याच्या मोठ्या प्रवाहात कार नेऊन स्टंटचा व्हिडीओ काढला होता.
राजकोटमधील स्थानिक पोलिस कॉंस्टेबल शिवभद्रसिंग गोहिल यांनी घटनेची माहिती देताना संबंधित तरुणाने कारचा स्टंट करून व्हिडीओ इंस्टाग्रावर पोस्ट केला होता असे म्हटले. या तरुणाचे नाव सत्यजीत सिंग जाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सत्यजित सिंग जालाने पोलिसांना माहिती देताना म्हटले, "११ जुलैला मी माझे मित्र रवी वेकारिया, स्मित सखिया छयांशू सगपरिया आम्ही आमचा मित्र अर्जुनसिंग जडेजाच्या कारमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी न्याहारी धरणाजवळ एकत्र आलो होतो. धरणाच्या वरील भागात जास्त पाऊस झाल्यामुळे खालील बाजूस पाण्याचा प्रवाह जास्त होता, धरणाच्या एका टोकाला पाण्याची पातळी कमी होती म्हणून स्मितने पाण्यात गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. छयांशू आणि रवीने गाडीच्या दोन्ही बाजूला उभे राहून गाडी खोल पाण्यात नेली."
व्हिडीओ व्हायरल होताच तरुणाला अटक
दरम्यान, स्टंटचा थरार सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी आम्ही व्हिडीओ काढली असे सत्यजित सिगंने सांगितले. हा व्हिडीओ त्यानेच त्याच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता ज्याच्यानंतर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिस कॉन्स्टेबलने सांगितले की, राजकोट पोलिसांनी छयांशू सगपरियाला कारसह अटक केली आहे तसेच रवी आणि स्मितचा शोध सुरू आहे, ते गुरुवारी संध्याकाळी तक्रार दाखल झाल्यापासून फरार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला आहे.