आवाज करू नका, आई झोपली आहे; चिमुकल्यांनी मृत आईसाेबत काढले दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:31 AM2021-10-04T07:31:51+5:302021-10-04T07:32:08+5:30
पाेलीस घरात दाखल झाले तेव्हाही त्यांनी पाेलिसांना ‘शांत राहा, आई झाेपली आहे’
पॅरिस : लहान मुले अतिशय निरागस असतात. आजूबाजूला काय घडत आहे, याची त्यांच्या हळव्या मनाला जाणीव नसते. फ्रान्समध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. दाेन चिमुकल्या मुलींच्या आईचा घरातच अचानक मृत्यू झाला. मात्र, याबाबत त्यांना काहीच जाणीव नव्हती.
पाेलीस घरात दाखल झाले तेव्हाही त्यांनी पाेलिसांना ‘शांत राहा, आई झाेपली आहे’, असे निरागसपणे सांगितले. फ्रान्सच्या ली मान्स या शहरातील ही घटना आहे. या मुलींचे वय अनुक्रमे ५ आणि ७ वर्षे आहेत. अनेक दिवसांपासून त्या शाळेत अनुपस्थित हाेत्या. त्यामुळे शाळेकडून पाेलिसांना सूचना देण्यात आली हाेती. त्यावरून पाेलिसांनी त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मुलींच्या आईचा जन्म १९९० चा आहे. प्राथमिकदृष्ट्या तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. मात्र, कधीपासून या मुली त्यांच्या मृत आईसाेबत हाेत्या, याबाबत माहिती नाही.
समुपदेशन...
मुलींना रुग्णालयात दाखल केले असून मानसाेपचार तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन सुरू आहे. काही दिवसांनी मुलीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल.