बॅटमनच्या वेशात येऊन डॉक्टरने छोट्या रुग्णाचे स्वप्न साकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:20 AM2020-11-16T05:20:05+5:302020-11-16T05:20:11+5:30
५ हजार वेळा पाहिला गेला व्हिडिओ
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : डॉक्टर त्यांचे कर्तव्य पार पाडताना रुग्णाची मानसिकता व त्याच्या छोट्याशा इच्छेचा विचार करीत असतील तर खूप चांगला परिणाम दिसतो. असाच एक चांगला परिणाम घडवणारा एक डॉक्टर आणि त्यांच्या छोट्या रुग्णाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ फील गुड पेजने ट्विटरवर पोस्ट केला असून तो बघणाऱ्याला भावनात्मक करून टाकतो. अवघ्या काही तासांत तो ऑनलाईनवर पाच हजार वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ कर्करोग झालेल्या एका छोट्या मुलाची व त्याच्या डॉक्टरची कथा सांगतो. हा डॉक्टर या छोट्या रुग्णाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅटमनच्या वेशात येतो. या छोट्या मुलाला हा डॉक्टर तुझी सगळ्यात मोठी इच्छा कोणती असे विचारतो. तो म्हणतो मला बॅटमनला भेटायचे आहे.
दुसऱ्या दिवशी हा डॉक्टर बॅटमनच्या वेशात रुग्णालयात येऊन मुलाला भेटतो. मुलगा खूपच भारावून जातो व डॉक्टरला मिठीच मारतो.
पोस्टने लिहिले की, “डॉक्टर कर्करोग्याला विचारतो की तुझे स्वप्न काय आहे? मुलगा म्हणतो मला बॅटमनला भेटायचे आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर सुपरहिरोच्या वेशात येऊन मुलाचे स्वप्न पूर्ण करतो.”
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे भरून आले. या खूप छोट्या क्लीपने नेटिझन्सचे शेकडो लाईक्स मिळविले.
“जगात किती चांगले लोक आहेत. किती साधा चांगुलपणा,” असे एका नेटिझनने म्हटले. तर दुसरा म्हणतो, “मी रडत नाही. तू रडतोय? किती भावना हेलावून टाकणारे.”