अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात; ३ दिवस ट्रक ड्रायव्हर मृत्यूच्या दारात, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:28 PM2022-01-06T13:28:38+5:302022-01-06T13:28:58+5:30
हा ड्रायव्हर ३३० फूट उंचीवर बनत असलेल्या रस्त्यावरुन ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी अचानक ट्रकचे चाक घसरले आणि तो मध्येच लटकत राहिला
प्रत्येक वर्षी जगात लाखो लोकांचा जीव रस्ते अपघातात जातो. परंतु काही लोकांचं नशीब बलवत्तर असतं जे अत्यंत धोकादायक अपघातातूनही जिवंत वाचतात. असाच काहीसा किस्सा चीनमधील ट्रक ड्रायव्हरसोबत घडला आहे. जो ३ दिवसांपर्यंत ३३० फूट उंचीवरुन ट्रक अपघातात जीवन आणि मृत्यूसोबत संघर्ष करत राहिला. त्यानंतर या भयंकर अपघातातून तो सुदैवाने वाचला. या घटनेचा फोटो पाहून बघणाऱ्यांच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही.
३३० फूट उंचीवर जात होता ट्रक
या ट्रक ड्रायव्हरसोबत ही घटना उत्तरी चीनमध्ये घडली. हा ड्रायव्हर ३३० फूट उंचीवर बनत असलेल्या रस्त्यावरुन ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी अचानक ट्रकचे चाक घसरले आणि तो मध्येच लटकत राहिला. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ज्या रस्त्यावर ट्रकचा अपघात झाला होता तो डोंगराळ भाग आहे. विशेष म्हणजे ट्रक चालवत असलेला ड्रायव्हर ३ दिवसांपासून यात अडकून राहिला होता.
तुम्ही या फोटोत पाहू शकता की, कशारितीने ट्रकचा अर्धा भाग रस्त्यावर आणि अर्धा दरीत लटकत आहे. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला त्याठिकाणी मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. बर्फवृष्टी होत असल्याने याठिकाणच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. त्यामुळेच ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक एका कठड्यावर जाऊन लटकला.
३ दिवस ट्रक ड्रायव्हर होता मृत्यूच्या दारात
ही घटना १ जानेवारीला घडली असून गेल्या ३ दिवसांपासून तो ट्रक ड्रायव्हर मृत्यूच्या दारात उभा होता. जीवन आणि मृत्यू यादरम्यान ट्रक ड्रायव्हर लटकला होता. त्यानंतर टाउनिंग सर्व्हिसवाल्यांनी ४ जानेवारीला ड्रायव्हरच्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. ही घटना ज्या लोकांनी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी पाहिली त्यांचे भीतीने अंग थरथर कापत होते. ट्रक अपघातामुळे हायवे ३ दिवसांपासून बंद असल्याने इतर वाहन चालकांचीही गैरसोय झाली. चीनमधील या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वाहन अपघातांचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील पण या ट्रक अपघाताच्या घटनेचे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल.