अवकाळीने हिरावला तोंडचा घास; मातीमोल झालेलं पीक पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर, Video पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:41 PM2024-04-22T13:41:11+5:302024-04-22T13:47:49+5:30
सध्या सोशल मीडियावर एका शेतकऱ्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतंलय.
Social Viral : पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचं पीक पाण्याखाली गेलेलं पाहताच या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. त्याचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शेतकरी टिकला तर देश टिकेल असं आपण म्हणतो. अनेकदा जय जवान जय किसानचे नारे लावले जातात. पण, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे प्रश्न कायमचे डावळले जातात. अवकाळी पावसाने नुकसान झालं तर शेतकऱ्यांना केवळ प्रशासनाचा आधार असतो. सरकारी मदत केव्हा मिळेल याची चातकाप्रमाणे तो वाट पाहत असतो. पण त्याच्या नशीबी कायमच निराशा येते.
अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास नियतिने हिसकावून घेतलाय. या अवकाळी पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा प्रत्यय हा व्हायरल व्हिडिओ पाहून येईल. या शेतकऱ्याचं ओक्साबोक्शी रडणं पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. नशीबाला दोष देत हा शेतकरी धाय मोकळून रडतोय. माय-बाप शेतकऱ्याच्या कोणी वाली आहे की नाही? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.
insta_king_mh42 नावाच्या या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. ''शेतकऱ्यांचे दु:ख समजणारा एकही नेता नाही'', तसंच ''खचू जाऊ नका धीर धरा'' अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओओवर दिल्याच्या पाहायला मिळत आहेत.