नव्वदीतल्या आठ ‘रॅपर’ आज्ज्यांची धमाल ! वयस्कर लोकांना उमेदीने आणि आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:48 AM2024-02-20T08:48:14+5:302024-02-20T08:49:18+5:30
‘सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस’ हे काही परीकथेतल्या गोष्टीचं नाव नाही. हा एक आठजणींचा ग्रुप! प्रत्येकीचं वय नव्वदीच्या घरातलं. पण यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा.
‘सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस’ हे काही परीकथेतल्या गोष्टीचं नाव नाही. हा एक आठजणींचा ग्रुप! प्रत्येकीचं वय नव्वदीच्या घरातलं. पण यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा. आज या आठजणींनी आपल्या शहरातल्या इतर वयस्कर लोकांना उमेदीने आणि आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवला आहे. जगायचं तर मनमोकळं आणि स्वच्छंदी हा त्यांचा जगण्याचा मंत्र आहे. वृद्धांसोबतच तरुणांनाही आनंदी आणि आशावादी कसं जगायचं हा धडा शिकवणाऱ्या या आठ बायका आहेत दक्षिण कोरियातल्या. उत्तर जिऑगसॅंग प्रांतातील चिलगाॅक परगणा. तो दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलपासून चार तासांच्या अंतरावर आहे. या चिलगाॅकमध्ये सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस राहतात. २०२३च्या ऑगस्टपर्यंत त्या त्यांच्याच शहरातल्या लोकांनाही विशेष माहिती नव्हत्या. पण एका वर्षाच्या आत त्यांचं नाव जगभरात पोहोचलं ते त्यांच्या कामामुळे. ‘यू ट्यूब’सारख्या माध्यमावर या आज्यांचा सध्या बोलबाला आहे. नव्वदीच्या घरातल्या या बायकांनी ‘सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस’ नावाचा रॅप साॅंग म्हणणारा हिप-हाॅप ग्रुप सुरू केला. त्यांच्या ग्रुपला आता चिलगाॅकबाहेरील शहरांमधूनही बोलावणी येतात. मागीलवर्षी ऑगस्टमध्ये या ग्रुपने चिलगाॅकमधील कम्युनिटी सेंटरमध्ये पहिला कार्यक्रम केला आणि या ग्रुपमधल्या आठ बायका लगोलग सेलिब्रेटी झाल्या. बालवाडीतील मुलांपासून वृद्धांच्या ग्रुपपर्यंत वेगवेगळ्या गटातील लोकांसाठी ‘सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस’ हा ग्रुप रॅप साॅंगचे कार्यक्रम आयोजित करतो.
तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात आणि जोशात रॅप साॅंग म्हणणाऱ्या या आठजणींची लोकप्रियता वाऱ्याच्या वेगाने पसरते आहे. सुरूवातीला १५० जणांच्या चिलगाॅकमधल्या फॅन क्लबने आता देशाच्या बाहेरही हातपाय पसरले आहेत. यू ट्यूबवर सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस ग्रुपने ७७ हजार व्ह्यूजची कमाई केली आहे. जे वय निवृत्तीचं मानलं जातं, त्याच वयात सुनी आणि त्यांच्यासोबतच्या सात जणींनी एका नव्या आयुष्याची सुरुवात केली.
गावातलं वातावरण अगदीच उदास. गावात ना तरुणांची धावपळ ना लहान मुलांचा किलबिलाट. आजूबाजूला सर्व उतारवयाला लागलेली माणसं. हातात पुरेसे पैसे नसलेली. शहराकडे नोकरी करणारी मुलंही विशेष लक्ष देईनाशी झालेली. वृद्धांना आधार देणाऱ्या सेवासुविधा हाच काय तो येथील वृद्धांच्या जगण्याचा आधार. अशा जगण्यात कुठला आलाय आनंद आणि उत्साह? पण सुनी आणि तिच्यासोबतच्या सातजणी याला अपवादच म्हणायच्या. अशा वातावरणातही त्यांनी भूतकाळात जमा झालेली चहलपहल आपल्या जगण्यात पुन्हा खेचून आणली. किंडर गार्डनच्या चार भिंतीत रॅप साॅंगचे कार्यक्रम करणाऱ्या या आज्या टीव्हीवरही शोज करत आहेत.
८१ वर्षांच्या पार्क जेओम सून म्हणजेच स्टेजवरच्या सुनी! पूर्वीसारखे दिवस आता आपल्या वाट्याला नाहीत, म्हणून हताश झाल्या होत्या. त्याच सुनी आता बकेट हॅट, धातूचे दागिने आणि बॅगी पॅण्ट्स घालून रॅप साॅंग म्हणताना आपल्याला तरुण झाल्यासारखं वाटतं, असं सळसळत्या उत्साहानं सांगतात. सुनी आणि त्यांच्या ग्रुपमधील इतर सातजणींची ओळख २०१६ पासूनची. हंगूल शिकण्याच्या निमित्ताने त्या एकत्र आल्या. हंगूल ही कोरियन वर्णमाला आहे. १९५० ते १९५३ या काळात झालेल्या कोरियन युद्धादरम्यान सुनी आणि इतर सात जणींचं शिक्षण सुटलं. पण शिकण्याची इच्छा होतीच. ती पूर्ण करण्यासाठी २०१६ मध्ये हंगूल शिकवण्याच्या प्रौढ वर्गात सुनी आणि आता त्यांच्यासोबत असलेल्या सातजणी शिकायला आल्या. एकदा इंटरनेटवर पार्क यांनी रॅप साॅंगचा एक कार्यक्रम पाहिला.. आपणही असा रॅप साॅंगचा कार्यक्रम करावा, असं त्यांच्या मनात आलं. रॅप येतही नव्हतं तेव्हाच त्यांचा ग्रुप तयार झाल्या. हंगूलची वर्णमाला शिकवणाऱ्या शिक्षकांनीच त्यांना रॅप शिकवलं आणि सुनी आणि त्यांच्या सात मैत्रिणींचा हिप-हाॅप ग्रुप तयार झाला. त्या एकत्र तासनतास बसून रॅप लिहितात, ते एकत्र म्हणण्याचा सराव करतात. एका शाळेत कार्यक्रम केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, सुनी यांचा हा ग्रुप आता मागे वळून बघण्यास तयार नाही.
सुनी रॅप साॅंगमधून काय सांगतात?
सुनी आणि त्यांचा ग्रुप ‘पिकींग चिली फ्राॅम चिली फार्म, पिकिंग वाॅटरमेलन फ्राॅम वाॅटरमेलन फार्म’ अशी गाणी रचून आपल्या रॅपमधून त्यांच्या गावाची, गावातल्या शेतीची गोष्ट सांगतात. गावातलं दैनंदिन जीवन रॅपमधून उभं करण्याचा सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस ग्रुपचा उत्साह लोकांना त्यांच्या प्रेमात पाडत आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चिलगाॅक परगण्यात वृद्धांचे आणखी चार रॅप ग्रुप्स तयार झाले आहेत. वृद्धांमधील विस्मरण, एकाकीपणा कमी करण्यासाठी हे रॅप ग्रुप्स कार्यक्रम करत आहेत.