लिंबू कलरच्या साडीतल्या 'ती'चं स्वप्न मोठ्ठं आहे बॉस!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 04:37 PM2019-05-16T16:37:53+5:302019-05-16T16:38:34+5:30
लिंबू कलरच्या साडीतले फोटो सोशल मीडियावर हिट
लखनऊ: लिंबू कलरची साडी, त्यावर काळा चष्मा आणि गळ्यात निवडणूक आयोगाच्या सेवेत असल्याचं ओळखपत्र. रीना द्विवेदी यांचे या लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ सहाय्यक असलेल्या लखनऊच्या रीना द्विवेदी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता रीना यांनी बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला निमंत्रण मिळाल्यास नक्की बिग बॉसमध्ये सहभागी होईन, असं रीना यांनी म्हटलं.
निवडणुकीच्या कामासाठी लखनऊमधल्या नगराम इथल्या मतदान केंद्रावरुन रवाना होत असताना लिंबू कलरची साडी नेसलेल्या रीना यांचे फोटो काढण्यात आले. पाहता पाहता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर लिंबू कलरची साडी नेसलेली ती महिला आहे तरी कोण, याचा नेटकऱ्यांना शोध सुरू केला. यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये रीना यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. 'माझं कुटुंब कायम माझ्या सोबत आहे. मला एक वेगळी ओळख मिळाल्यानं त्यांना आनंद झाला आहे. संधी मिळाल्यास बिग बॉस माझ्यासाठी सुवर्णसंधी असेल', असं रीना यांनी म्हटलं.
रिना यांचा मुलगा अदित नववीत शिकतो. रीना यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अदितनं त्यांना व्हिडीओ कॉल केला. इंटरनेटवर चर्चेत असलेली 'लिंबू कलरच्या साडीतील महिला' आपली आई आहे हे मित्रांना दाखवून देण्यासाठी अदितनं रीना यांना फोन केला होता. मला मेक अप करायला, व्यवस्थित राहायला आवडतं आणि यात मला काहीच चुकीचं वाटत नाही, असं रीना म्हणाल्या.