Emotional Story: अवघ्या नेटकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; १० वर्षांची विद्यार्थिनी लहान भावाला मांडीवर घेऊन शाळेत बसतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:34 AM2022-04-04T11:34:23+5:302022-04-04T11:35:14+5:30
Manipur Girl Trending Photo's: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना हे समजल्यावर त्यांनी तातडीने त्या शाळेत चाइल्डलाइन सेवा दलाला पाठविले आणि तिच्या कुटुंबाला एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत मदत देऊ केली.
मणिपूरमधील एका विद्यार्थिनीचा भावनिक करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून प्रत्येकजण तिच्या जिद्दीला आणि तिच्यावर आलेल्या परिस्थितीवर अश्रू ढाळत आहे. फोटोच खूप काही सांगून जाणारा आहे.
११ वर्षांची विद्यार्थिनी मीनिंग्सिनलिउ पमेई आपल्या तान्हुल्या भावाला घेऊन शाळेत येत आहे. तिच्यावर त्याच्या पालनपोषनाची जबाबदारी आली आहे. परंतू तिला शिक्षणही सोडायचे नाहीय. यामुळे ती चिमुकल्या भावाला घेऊन शाळेत जात आहे.
11 वर्षांच्या मीनिंग्सिनलिउ पामेईच्या एका हातात लहान बाळ आहे. ती खुर्चीवर बसली आहे आणि डेस्कवर ठेवलेल्या वहीमध्ये काहीतरी लिहित आहे. तिचा भाऊ मुलाच्या मांडीवर झोपला आहे, असा हा फोटो आहे. ही मुलगी दुर्गम झेलियनग्रॉन्ग नागाबहुल तामेंगलाँग जिल्ह्यातील आहे. आई-वडील शेतात कामाला जातात. ती डेलॉन्ग व्हिलेजमधील स्वायत्त जिल्हा परिषद संचालित डेलॉन्ग प्राथमिक शाळेत शिकते.
आई-वडील कामावर गेल्यावर घराची आणि लहान भावंडांची जबाबदारी तिच्यावर येते. मीनिंग्सिनलिउ ही सर्वात मोठी आहे. तिची अन्य दोन भावंडे घरीच असतात. परंतू त्यांच्या भरवशावर ती लहान भावाला सोडू शकत नाही. यामुळे ती या लहान भावाला आपल्यासोबत शाळेत घेऊन येते.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना हे समजल्यावर त्यांनी तातडीने त्या शाळेत चाइल्डलाइन सेवा दलाला पाठविले आणि तिच्या कुटुंबाला एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत मदत देऊ केली. कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून रेशन देण्यात आले. कॅबिनेट मंत्री बिस्वजित सिंह यांनी मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.