हृदयस्पर्शी! ऑफिसच्या सुरक्षा रक्षकाला कर्मचाऱ्यांनी दिलं स्पेशल सरप्राईज; पाहताच पाणावले डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 03:23 PM2023-05-10T15:23:59+5:302023-05-10T15:24:30+5:30
एक छोटीशी कृती कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असते.
वाढदिवस हा खरंच प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास प्रसंग असतो. तो आणखी खास होतो जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आनंदात, मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करतात. पण अनेकदा अभ्यास, काम किंवा व्यवसायामुळे राहण्याच्या ठिकाणाहून बाहेर जावे लागते. जबाबदाऱीमुळे आणि पैसे कमावण्यासाठी खास प्रसंगी आणि सणांना घरी परतणे खूप कठीण होऊन बसते. वाढदिवस असतानाही काही जण कामावर असतात.
काही वेळा काम तुम्हाला तुमच्या गावापासून दूर राहण्यास भाग पाडते. अशा वेळी तुमचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी कुणी प्रयत्न केले तर खूप बरं वाटतं. तो कोणीही असू शकतो, तुमचा शेजारी किंवा तुमच्या ऑफिसमधील सहकारी. तब्बल आठ वर्षांनंतर कार्यालयातील कर्मचारी गटाने एका सुरक्षा रक्षकाचा वाढदिवस साजरा केला. हा क्षण पाहिल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला. एक छोटीशी कृती कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असते हे समजतं.
वर्ल्ड ऑफ बझच्या रिपोर्टनुसार, व्हायरल क्लिप आता टिकटॉकवरून हटवण्यात आली आहे. मलेशियातील एका कार्यालयात आठ वर्षे काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला घरी परतण्याची संधी मिळाली नाही. व्हिडिओनुसार तो दरवर्षी एकटाच वाढदिवस साजरा करत असायचा. त्याने कमावलेल्या पैशातील काही भाग त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबासाठी पाठवणे ही त्यांची एकमेव जबाबदारी होती.
कर्मचारी सुरक्षा रक्षकाला कार्यालयाच्या परिसरात बोलावताना दिसतं. त्याने एंट्री घेताच सर्व त्याच्याभोवती हॅपी बर्थडे गाणं गाऊ लागले. हे पाहून सुरक्षा रक्षकाला आपले अश्रू अनावर झाले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा रक्षकाला वाढदिवसाचा केक आणून एक तुकडा खाऊ घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. भारतात टिकटॉकवर बंदी आहे. यामुळे व्हिडिओही पाहता येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.