Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:04 AM2024-11-22T11:04:16+5:302024-11-22T11:05:04+5:30
लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला स्टेजवरच हार्ट अटॅक आला आहे.
आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला स्टेजवरच हार्ट अटॅक आला आहे. यानंतर तरुणाला लगेचच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
कर्नूलच्या पेनुमाडा गावात ही हृदयद्रावक घटना घडली. जेथे बंगळुरूमधील ॲमेझॉन कंपनीत काम करणारा वामसी नावाचा तरुण आपल्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. लग्न समारंभात आनंदाने सहभागी झाला. वामसीने स्टेजवर नवविवाहित दाम्पत्यावा शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे इतरही काही मित्र होते. नवरा-नवरीने देखील भेटवस्तू उघडण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हाच वामसीचा तोल गेला.
కర్నూలు జిల్లాలో స్నేహితుడి వివాహ వేడుకలో గుండెపోటుకు గురైన వ్యక్తి, ఆసుపత్రికి తీసుకువెళ్లగా గుండెపోటుతో మరణించినట్లు నిర్ధారించిన డాక్టర్లు.#Heartattack#Kurnool#AndhraPradesh#UANowpic.twitter.com/R0QGsv32sg
— ఉత్తరాంధ్ర నౌ! (@UttarandhraNow) November 21, 2024
वामसीच्या बाजुला उपस्थित असलेल्या मित्रांनी त्याला खाली पडण्यापासून वाचवलं. अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळणार तेवढ्यातच जवळच उभ्या असलेल्या मित्राने त्याला पकडलं आणि एका ठिकाणी बसवलं. याच दरम्यान वामसीला तातडीने जवळच्या शहरातील शासकीय रुग्णालयात नें असता डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आल्याने मृत घोषित केलं.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिममध्ये व्यायाम करताना किंवा इतर परिस्थितीत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डॉ. रवी गुप्ता यांनी यामागची अनेक कारणं दिली आहेत. मधुमेह, बैठी जीवनशैली, वायूप्रदूषण, मानसिक ताणतणाव, अतिव्यायाम आणि स्टिरॉइड्स यांसारख्या गोष्टी तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांमागे मुख्य कारण असल्याचं म्हटलं आहे.