Fact Check: लस घेतल्यानंतर दंडात येतो करंट? त्या विजेने बल्बही पेटतो?; जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:06 AM2021-05-31T10:06:36+5:302021-05-31T10:08:02+5:30
लस घेतलेल्या जागेवर करंट निर्माण होतो त्याने बल्ब पेटतो असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
मुंबई- कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत सोशल मीडियावर अनेक चुकीच्या आणि बनावट बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोना लसीकरणावरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करतायेत. त्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण होत आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात लसीकरणावरून एक खळबळजनक दावा केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दावा केलाय की, कोविड १९ लसीकरणानंतर(Covid 19 Vaccination) ज्या हाताच्या दंडावर तुम्ही लस घेता त्यामध्ये विजेचा करंट निर्माण होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती दावा करतोय. ज्या दंडावर लस घेतली आहे तिथे विजेचा बल्ब टच केला असता तो पेटतो. तर लस न घेतलेल्या दंडापासून दुसरीकडे बल्बचा टच केल्यानंतर तो पेटत नाही. लस घेतलेल्या जागेवर करंट निर्माण होतो त्याने बल्ब पेटतो असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
PIB फॅक्ट चेकने या व्हिडीओची सत्यता पडताळत सांगितले की, या व्यक्तीने व्हिडीओत जो दावा केला आहे तो पूर्णपणे खोटा आहे. कोविड लसीकरण हे सुरक्षित आहे. अशाप्रकारे बनावट आणि अफवा पसरवू नका. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कोविड १९ लसीकरणात कोणताही धातू अथवा मायक्रोचिप नाही. किंवा लसीकरणानंतर शरीरात कोणताही चुंबकीय प्रभाव तयार होत नाही ज्याने विजेचा बल्ब पेटेल. त्यामुळे बल्ब पेटवण्याचा दावा चुकीचा आणि निराधार आहे असंही पीआयबीनं स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका, कोरोना लसीकरण नक्की करा, कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. प्रत्येकाने लसीकरण करायला हवं असं आवाहन पीआयबीनं लोकांना केले आहे.
सोशल मीडिया पर शेयर किए जा रहे एक वीडियो में दावा किया गया जा रहा है कि #COVID19 के टीकाकरण के बाद, टीका लगाए हुए बाहों से बिजली उत्पन्न हो जाती है।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। #CovidVaccine पूरी तरह सुरक्षित है। ऐसे फ़र्ज़ी सूचनाओं पर विश्वास न करें,टीकाकरण जरूर करवाएं। pic.twitter.com/pngYElNSjp
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 30, 2021
कोरोनाच्या संकटात आशेचा किरण!
देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रविवारी कोरोनाचे 1 लाख 65 हजार 553 नवे रुग्ण आढळून आले. गेल्या 46 दिवसांतील हा नीचांक आहे. याला बळी पडणारे तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून, रविवारी 3260 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 असून, त्यातील 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 जण बरे झाले. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 लोकांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे. जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील.