Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 10:15 AM2020-07-25T10:15:06+5:302020-07-25T10:18:19+5:30
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हजारो रुपये कुटुंबाला मदत म्हणून मिळाले, या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात जाऊन याची पडताळणी केली
नवी दिल्ली – सध्या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एक घटना सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये गुंमर गावातील कुलदीप कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकली, आणि त्यातून मिळालेल्या ६ हजार रुपयातं स्मार्टफोन खरेदी केला, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, अभिनेता सोनू सूदही मदतीसाठी सरसावला, प्रशासन खडबडून जागे झाले.
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हजारो रुपये कुटुंबाला मदत म्हणून मिळाले, या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात जाऊन याची पडताळणी केली. त्यात सत्य उघड झालं. कुलदीप कुमार यांच्याकडे ७ जनावरे आहेत, तीन महिन्यापूर्वी त्यांनी गाय विकली, पण त्याआधीच मुलीच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन खरेदी केला होता असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलदीप यांच्याबाबत बातमी प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने मदतीसाठी गुंमर गावात धाव घेतली. याठिकाणी कुलदीप यांच्याकडे ७ जनावरे असून त्यांच्या दुधविक्रीतून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात असं निदर्शनास आलं.
तसेच त्यांच्या घराच्या जवळ सरकारी शाळा असतानाही कुलदीप यांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेतात, त्याचसोबत मुलांसाठी महागडी पुस्तके खरेदी करतात, कौटुंबिक वाद सुरु असल्याने सध्या कुलदीप यांचे कुटुंब जनावरांच्या गोठ्यात राहत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेत कुलदीप यांच्या घरी पोहचले. त्यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. कुलदीप यांनी गावातील सुरेंद्र मोहन यांना १० जलै रोजी ६ हजार रुपयांना गाय विकली, कारण पावसाळ्यामुळे त्यांना गोठ्यात ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्याचसोबत कुलदीप यांनी मुलीसाठी ३ महिन्यापूर्वी म्हणजे ३० एप्रिलच्या दरम्यान स्मार्टफोन खरेदी केला होता.
अलीकडेच पंतप्रधान आवास योजनेतून कुलदीप कुमार यांना पंचायत समितीकडून घरासाठी पात्र ठरवण्यात आल्याचीही माहिती आहे. कांगडा जिल्हा प्रशासकीय अधिकारी राकेश प्रजापती म्हणाले की, ही बातमी पाहिल्यानंतर तहसिलदार आणि अधिकाऱ्यांना कुटुंबाची माहिती घेण्यास पाठवले, तेव्हा ही सगळी माहिती उघड झाली. कुलदीप यांनी इच्छेनुसार गाय विकली आणि गाय विकण्याचं कारणही वेगळे आहे. आम्ही कुलदीप यांना गाय पुन्हा देण्याची ऑफर दिली पण त्यांनी जागा नसल्याचं कारण देत नकार दिला असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'
...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं