व्हायरल सत्य! स्वामी असिमानंदांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश खरंच भाजपामध्ये झाले सामील?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 04:59 PM2019-03-31T16:59:29+5:302019-03-31T17:00:31+5:30
या भीषण बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप स्वामी असिमानंद यांच्यावर करण्यात आला होता.
नवी दिल्ली- 18 मे 2007 या दिवशी हैदराबादच्या मक्का मशिदीत भीषण बॉम्बस्फोट घडवून त्यात नऊ निरपराधांचे बळी गेले होते. या भीषण बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप स्वामी असिमानंद यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र रेड्डी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. आता तेच न्यायाधीश रवींद्र रेड्डी भाजपामध्ये सहभागी झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
त्या फोटोमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याबरोबरच भगवी वस्त्रे परिधान केलेली आणखी एक व्यक्ती दिसत आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मक्का मशिदीत भीषण बॉम्बस्फोट प्रकरणावर निकाल देणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी असल्याची चर्चा आहे. परंतु त्याची पडताळणी केली असता ते खोटं असल्याचं समोर आलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती छत्तीसगड काँग्रेसचे माजी नेते रामदयाल उइके आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मंगलोर व्हाइस या फेसबुक पेजवर ही पोस्ट टाकण्यात आली असून, त्यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.