नेटिझन्सकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर; 'नायक' अनिल कपूर यांचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 11:49 AM2019-11-02T11:49:03+5:302019-11-02T11:59:43+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक आहे. तसेच, सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे.
'नायक' या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अनिल कपूर हे एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. दोन पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत जोपर्यंत निर्णय घेत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपूरची नियुक्ती करा असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी कोणता मार्ग निघत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा. पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ पूर्ण देशाने पाहिला आणि कौतुकही केलं. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काय विचार आहे तुमचा?' असं ट्वीट एका युजरने केलं आहे. तसेच युजर्सने आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील ते टॅग केलं आहे.
महाराष्ट्र में जब तक कोई रास्ता नहीं निकलता तब तक @AnilKapoor को ही मुख्यमंत्री बना कर देख लेते हैं। पर्दे पर उनके एक दिन का कार्यकाल पूरे देश ने देखा है और सराहा है। @Dev_Fadnavis और @AUThackeray क्या सोच रहे हैं ?? pic.twitter.com/GSCIL9mo2R
— Vijay gupta (@vijaymau) October 30, 2019
युजर्सचं हे मुख्यमंत्रिपदाबाबतचं ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे. तर काहींनी हा पर्याय आवडल्याचं देखील सांगितलं आहे. नेटिझन्सच्या या मागणीला अभिनेते अनिल कपूर यांनी देखील भन्नाट उत्तर दिलं आहे. 'मैं nayak ही ठिक हूँ' असं अनिल कपूर यांनी म्हटलं आहे. अनिल कपूर यांनी दिलेल्या या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नायक या चित्रपटात अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. समाजात बदल घडवणारी अनेक कामं ते एका दिवसात करतात. आजही हा चित्रपट अनेकांना पाहायला आवडतो.
मैं nayak ही टीक हूँ 😎@vijaymauhttps://t.co/zs7OPYEvCP
— Anil Kapoor (@AnilKapoor) October 31, 2019
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असल्याने अनिल कपूर यांना काही दिवसांपूर्वी बॉलिवूडसोबतच राजकारणाविषयी देखील विचारण्यात आले. अनिल कपूर यांनी नायक या चित्रपटात एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळल्यानंतर केवळ एका दिवसात राज्यात किती बदल घडतात हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाले होते. याच चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते. अनिल यांनी क्षणाचाही विलंब न करता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे नायक असल्याचे कबूल केले. 'बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच माझे ठाकरे कुटुंबियांसोबत खूप चांगले संबंध आहेत. तसेच माझे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील खूपच चांगले नाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघेही तडफदार आणि अभ्यासू असून ते दोघे महाराष्ट्रासाठी खूप चांगले काम करतील याचा मला विश्वास आहे' असं अनिल कपूर यांनी म्हटलं होतं.