नशिबाने थट्टा मांडली! महिलेने 190 कोटींची लॉटरी जिंकली; पण तिकिट ठेवलेली पँट धुवून टाकली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:45 AM2021-05-15T11:45:03+5:302021-05-15T11:45:35+5:30
Super Lotto Plus lottery ticket: आजकाल कोणाचे नशीब कधी पालटेल याचा नेम नाही. कॅलिफोर्नियामध्ये एक महिला मोठ्या काळापासून लॉटरीची तिकिटे खरेदी कराय़ची. नेहमी ती तिकिटे जपून ठेवून निकाल लागला की आपला नंबर आहे का, ते तपासायची. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये देखील तिने एका सुपर लोट्टो लॉटरीचे तिकिट (SuperLotto Plus ticket) खरेदी केले होते.
दैव देते, कर्म नेते ही उक्ती अगदी चपखल बसेल अशी एक घटना घडली आहे. अमेरिकेच्या (America) कॅलिफोर्नियामध्ये एका महिलेला थोडी थोडकी नव्हे तर 190 कोटींची लॉटरी (Won 190 cr lottery) लागली होती, परंतू तिच्या एका चुकीने सारेकाही मातीमोल करून टाकले आहे. (american women Won 190 cr lottery, but lost lucky ticket.)
आजकाल कोणाचे नशीब कधी पालटेल याचा नेम नाही. कॅलिफोर्नियामध्ये एक महिला मोठ्या काळापासून लॉटरीची तिकिटे खरेदी कराय़ची. नेहमी ती तिकिटे जपून ठेवून निकाल लागला की आपला नंबर आहे का, ते तपासायची. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये देखील तिने एका सुपर लोट्टो लॉटरीचे तिकिट (SuperLotto Plus ticket) खरेदी केले होते. 26 दशलक्ष डॉलरएवढे पहिले बक्षिस होते. भारतीय रुपयांप्रमाणे 190 कोटी रुपये होतात. गेल्या गुरुवारी लॉटरीची रक्कम स्वीकारण्याची शेवटची तारीख होती. परंतू कोणीत या रकमेवर दावा करण्यासाठी आले नाही.
माहिती काढली असता हे लकी तिकिट लॉस अंजेलिसच्या एका दुकानातून विकले गेले होते. बुधवारी एक महिला त्या स्टोअरवर आली होती. तिने ही रक्कम जिंकल्याचा दावा केला होता. दुकानाचे कर्मचारी एस्पेरांजा हर्नांडेज यांच्यानुसार त्या महिलेने ते तिकिट हरविले आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिने ते तिकिट खरेदी केले होते. तसेच त्या तिकिटाचा नंबर लिहून ठेवला होता. यानंतर तिने ते तिकिट पँटच्या खिशात ठेवले आणि विसरली. काही दिवसांनी तिने ती पँट लाँड्रीमध्ये धुण्यासाठी पाठविली, यामुळे ते तिकिट खराब झाले.
दुकानाच्या मालकाने सांगितले की, ज्या दिवशी ते लकी तिकिट विकले गेले होते त्या दिवशी ही महिला दुकानात आली होती. हे सीसीटीव्हीमध्ये दिसले आहे. याशिवाय ती नेहमी तिथूनच तिकिट खरेदी करत असल्याने दुकानातील कर्मचारीही तिला ओळखत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला ते तिकिट खरेदी करत असताना आणि खिशात ठेवतानाचे रेकॉर्डिंग आहे. लॉटरी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनीही ते पाहिले.
लॉटरी कंपनी समोर पेच....
लॉटरी कंपनी आता मोठ्या पेचात अडकली आहे. कंपनीचे प्रवक्ते कैथी जॉनसन यांनी सांगितले की, महिलेचा दावा ना ही चुकीचा आहे, नाही बरोबर. सध्यातरी आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत. जर महिलेचा दावा खरा असला तर ही रक्कम लॉटरीची असल्याने ती कॅलिफोर्निया पब्लिक स्कूलला दान दिली जाईल. असा पहिलाच प्रसंग उद्भवला आहे.