‘बाप’ फोटो... लेकीच्या खांद्यावरचे तारे वडिलांनी न्याहाळले, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:57 PM2020-05-08T21:57:18+5:302020-05-08T22:00:59+5:30
मुलगी ही बापाचा स्वाभिमान असते, त्याच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. असाच एका बाप-लेकीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कॅमेऱ्यानं अचूक टिपला.
आपल्या मुलानं किंवा मुलीनं आयुष्यात त्यांचं ध्येय गाठल्यानंतर, उंच भरारी घेतल्यानंतर आई-वडिलांना होणारा आनंद शब्दातीत असतो. त्याचप्रमाणे, आपल्या यशामुळे आई-वडिलांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यांत पाहताना प्रत्येक मुलामुलीच्या मनात दाटून येणाऱ्या भावनाही अवर्णनीयच. असाच एका बाप-लेकीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कॅमेऱ्यानं अचूक टिपला आणि हा हृद्य 'सोहळा' जगाने पाहिला, त्यांच्या मनाला भावला. एक हजार शब्दही जे व्यक्त करू शकत नाहीत, ते एक फोटो बोलतो - सांगतो, याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली.
हा फोटो आहे, इम्फाळच्या पोलीस उपअधीक्षक Rattana Ngaseppa आणि त्यांच्या वडिलांचा. आपल्या मुलीच्या युनिफॉर्मवरचे चमचमणारे तारे वडील अभिमानाने न्याहाळत आहेत. पोरीनं जिद्दीनं आपलं ध्येय गाठल्यानं त्यांना असीम आनंद झाला आहे. तर, त्यांच्या डोळ्यातील चमक पाहून रत्तना यांच्या चेहऱ्यावर गोड हसू फुललंय. ज्याच्या खांद्यावर बसून मोठी स्वप्नं पाहिली, ज्याचा हात धरून पहिलं पाऊल टाकलं, ज्याच्या चेहऱ्यावरचं समाधान रत्तना यांच्यासाठी नक्कीच खास आहे आणि तेच त्यांच्या स्मितहास्यातून दिसतंय.
Rattana Ngaseppam, Deputy SP from Imphal, Manipur
— Amit Panchal (@AmitHPanchal) May 7, 2020
Her proud dad checking out the stars on her uniform. And #Rattana proudly watching the stars in her father's eyes. [Source: @_mohul]
Cc: @manipur_policepic.twitter.com/8WOgGIFOPB
“श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी”, या कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील ओळींमुळे वडील आणि मुलीचं नाजूक, संवेदनशील नातं तितकंच हळुवारपणे व्यक्त होतं. मुलगी ही बापाचा स्वाभिमान असते, त्याच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. या नात्यातील हा आपलेपणाचा ओलावा रत्तना आणि तिच्या वडिलांच्या फोटोतून सहज अभिव्यक्त होतोय. तो पाहून नेटिझन्सही भावुक झालेत. अनेकांचे डोळे पाणावलेत, कंठ दाटून आलाय. काहींनी आपल्या भावना प्रतिक्रियांमधून व्यक्त केल्यात, तर हजारो नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.