1st Child Birth, Video Call: चित्त 'त्याचे' पिलापाशी... बापाने व्हिडीओ कॉलवरून पाहिला लेकीचा जन्म; कारण नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:42 PM2022-02-09T16:42:46+5:302022-02-09T16:48:16+5:30
पत्नीला प्रसूती वेदना होत असताना व्हिडीओ कॉलवरून तो तिला आधार द्यायचा प्रयत्न करत होता.
एखादं ध्येय गाठायचं म्हटलं तर त्याच्या तयारीसाठी अनेक तडजोडी कराव्याच लागतात. अशीच एक तडजोड एका बापाला आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळी करावी लागली. अमेरिकन बाय-अँथलीट लीफ नॉर्डग्रेन याला आपल्या पहिल्या बाळाचा जन्म व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पाहावा लागला. बिजींग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत लीफची शर्यत ज्या दिवशी होती, त्याच्या आदल्याच दिवशी त्याच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. पण मनात असूनही लीफ ला आपल्या पत्नीजवळ थांबता आलं नाही, त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या जन्म घेताना पाहिली.
लीफ हा बायथलॉन या क्रीडा प्रकारात सहभागी झाला होता. या क्रीडा प्रकारासाठी तो चीनच्या बीजिंग शहरात आला. ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी ही थोड्या दिवसात होत नाही. त्यामुळे या स्पर्धेसाठी तो नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तयारी करत होता. तेव्हापासूनच तो त्याच्या पत्नीपासून दूर दुसऱ्या शहरात तयारीला गेला. त्याच्या पत्नीला प्रसूतीची अंदाजे तारीख ४ फेब्रुवारी देण्यात आली होती. पण त्या दरम्यान लीफ स्वत: ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चीनमध्ये आला होता. त्यामुळे अखेर त्याला आपल्या मुलीचा जन्म व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनच पाहावा लागला.
व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हा आनंदाचा क्षण पाहणं खूपच रोमांचक होतं असं तो म्हणाला. माझ्या कुटुंबासाठी लेकीचा जन्म ही खूपच विशेष गोष्ट आहे. जवळ नसलो तरी व्हिडीओच्या माध्यमातून पत्नीला आधार देताना मला बरं वाटलं, अशा भावना लीफने व्यक्त केल्या. मी माझ्या लेकीला भेटायला आतुर झालोय असंही तो म्हणाला.