बापमाणूस! लेकासाठी वडिलांनी सोडली पोलिसाची नोकरी; वकील बनून देताहेत लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:58 PM2024-01-31T15:58:03+5:302024-01-31T16:11:18+5:30
वडील झांग डिंगजी यांनी आपली ट्रॅफिक पोलीस ऑफिसरची नोकरी सोडली. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.
मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शाळेत पाठवलं जातं पण कधी कधी अशा काही धक्कादायक घटना त्यांच्यासोबत घडतात की ऐकून थरकाप होतो. अशीच एक भयंकर घटना चीनमधील एका व्यक्तीसोबत घडली आहे. जियांग्शी प्रांतात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या 11 वर्षांच्या मुलाला सर्वात चांगल्या शाळेत घातलं होतं. पण एक दिवस क्लास टीचर त्याला इतक्या वाईट पद्धतीने ओरडला की मुलगा फार अस्वस्थ झाला.
मुलाने थेट शाळेच्या 24 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शिक्षकाला शाळेतून काढून टाकण्यात आल. पण त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं मुलाच्या वडिलांचं म्हणणं होतं. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, वडील झांग डिंगजी यांनी आपली ट्रॅफिक पोलीस ऑफिसरची नोकरी सोडली. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि आता ते स्वतः त्यांचा मुलगा झांग कुआनची केस लढत आहेत.
मुलासोबत हे कृत्य करणाऱ्या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. इतकेच नाही तर गेली दोन वर्षे झांग डिंगजी आणि त्यांची पत्नी वांग बेली हे इतर कुटुंबांना कायदेशीर मदतही करत आहेत. ज्यांच्या मुलांना शाळेतील शिक्षक त्रास देत होते त्यांची केस मोफत लढत आहेत. झांग डिंगजी सांगतात, आता अशा शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर नेण्याचा माझा उद्देश आहे. जेणेकरून त्यांनी कोणाच्याही मुलांसोबत असे प्रकार करू नये. चिनी सोशल मीडियावर हे खूप व्हायरल होत आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं की, माझ्या मृत्यूशी माझे आई-वडील, समाज किंवा देशाचा काहीही संबंध नाही. याचे एकमेव कारण जू आहे, जो मला त्रास देत होता. जू झांग हा मुलाचा क्लास टीचर होता. मुलाच्या मृत्यूनंतर, पालकांनी शाळेचे सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्यांना दिसलं की जू मुलावर वारंवार अत्याचार करत होता.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जूला शाळेतून काढून टाकण्यात आलं. मात्र काही दिवसांतच त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. सुनावणीसाठी पुरेसे पुरावे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर वडील झांग डिंगजी यांनी स्वत: कायद्याचं शिक्षण घेतलं आणि त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेलं आहे.