कॅब ड्रायव्हर आणि महिलेमध्ये 5 रुपयांवरून वाद; Video व्हायरल होताच कंपनीने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:43 AM2023-12-13T11:43:15+5:302023-12-13T11:44:52+5:30
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आणि कॅब ड्रायव्हर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. पाच रुपयांवरून त्यांच्यात भांडण झालं. महिलेने आरोप केला आहे की, तिने जे लोकेशन टाकलेलं तिथपर्यंत जितके पैसे झाले त्यापेक्षा ड्रायव्हर पाच रुपये जास्त मागत होता. महिला आणि कॅब ड्रायव्हरमधील हा वाद पाहून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला कॅब ड्रायव्हर महिलेला 100 रुपये देण्यास सांगतो, तर कॅब बुक करताना भाडं 95 रुपये दाखवण्यात आलं होतं. यावर महिलेने विचारले की तुम्ही 5 रुपये जास्त का घेत आहात? ती फोनवर रेकॉर्डिंगही सुरू करते. यानंतर ड्रायव्हर तिच्यावर चिडतो. तो महिलेवर ओरडायला लागतो.
ड्रायव्हर त्या महिलेला सांगतो की, प्रवासादरम्यान जर जास्त कॅब चालवावी लागली तर प्रवासी अधिक पैसे देतात. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॅब कंपनीने ड्रायव्हरच्या वागणुकीबद्दल माफी मागितली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असं ते म्हणाले. inDrive ने दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या प्रवाशांच्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत."
"आमच्या प्लॅटफॉर्मवर ड्रायव्हरचं असं वागणं अजिबात सहन केलं जाणार नाही. आम्ही आमच्या ग्राहकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्यामुळे अशा घटनांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यास वचनबद्ध आहोत. आमची टीम अंतर्गत तपासणी करेल आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. याबद्दल पोस्ट करणार्या व्यक्तीला आम्ही वैयक्तिकरित्या आमच्याशी संपर्क साधण्याची विनंती करतो. तुम्ही शेअर करू शकता अशी कोणतीही अतिरिक्त माहिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. धन्यवाद." सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.