Viral Video: जीवाची पर्वा न करता कुत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस उतरला बर्फाने गोठलेल्या नदीत, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:05 PM2022-03-08T16:05:03+5:302022-03-08T16:10:04+5:30
एका श्वानाला वाचवण्यासाठी एक पोलीस कर्मचारी बर्फाने गोठलेल्या नदीत उतरला.
माणूस असो किंवा झाडं नाहीतर पक्षी, सजीव असणारा प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी छोट्या जिवालाही पृथ्वीवर जगण्याचा तितकाच हक्क आहे, जितका माणसाला आहे. अनेकदा माणसं प्राण्यांना त्रास देतात किंवा मारतात मात्र काही लोक असेही आहे जे प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आपला जीवही धोक्यात घालतात. असंच काहीसं दृश्य नुकतंच अमेरिकेत पाहायला मिळालं (Police Save Dog from Frozen River Video). जेव्हा एका श्वानाला वाचवण्यासाठी एक पोलीस कर्मचारी बर्फाने गोठलेल्या नदीत उतरला (Police Save dog from River).
अमेरिकेच्या मिशिगनमधून एक हैराण करणारी घटना समोर आली. यात एक कुत्रा आपल्या मालकासोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता, यावेळी तो अचानक नदीकडे धावला आणि अतिशय थंड गोठलेल्या नदीत त्याने उडी घेतली. यानंतर अनेक प्रयत्न करून तो नदीतील एका बर्फाच्या तुकड्यावर चढला. मात्र हा तुकडा वाहून नदीमध्ये आणखीच आत गेला. तेव्हा वायंडोटे पोलीस डिपार्टमेंटने कुत्र्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.
पोलीस, फायर फायटर डिपार्टमेंट आणि अॅनिमल डिपार्टमेंटने मिळून हे ऑपरेशन चालवलं. याचाच व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की हा कुत्रा बर्फाच्या तुकड्यावर बसला असून थंडीने अक्षरशः कापत आहे. दुसरीकडे बचाव पथकातील एक कर्मचारी पाण्यात उभा राहिला आहे. तो एका काठीने कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि पट्टा हातात येताच तो त्याला ओढू लागतो. यानंतर श्वानाला तिथून बाहेर काढून नावेमध्ये असलेल्या आपल्या साथीदारांकडे देतो.
\या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं, बचाव पथकाने खूप चांगलं काम केलं, आनंद आहे की श्वानाचा जीव वाचला. दुसऱ्या एकाने लिहिलं, अशा आणखी लोकांना या विभागात नोकरी द्यायला हवी, जेणेकरून ते मुक्या प्राण्यांना वाचवतील. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.