मच्छिमाराच्या हाती लागला खजिना; जाळ्यात माशांऐवजी मिळाला IPhone चा पेटारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 08:55 AM2021-12-20T08:55:56+5:302021-12-20T09:00:00+5:30
सुरुवातीला हे बॉक्स रिकामे असतील असं त्यांना वाटतं. परंतु जेव्हा ते उघडले तेव्हा सर्वजण हैराण झाले.
असं म्हणतात की, एखाद्या व्यक्तीचं नशीब बदललं तर रातोरात तो व्यक्ती मालामाल होतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळाली असतील. कुणाला लॉटरी लागली तर कुणाच्या हाती खजिना लागला. अलीकडेच असाच काहीसा किस्सा इंडोनेशियामधून समोर आला आहे. ज्याठिकाणी एक मच्छिमार गेल्या अनेक वर्षांपासून मासे पकडण्याचं काम करत होता. मासेमारीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आयुष्यात आर्थिक तंगीमुळे संघर्ष करत असणारा हा मच्छिमार एकेदिवेशी बोट घेऊन समुद्रात गेला परंतु त्या दिवशी त्याचं नशीब पालटलं.
मीडिया रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या बांग्का बेलितुंग येथील काही मच्छिमार मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. त्यांनी मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे फेकले. परंतु जेव्हा हे जाळे खेचण्यात आले तेव्हा ते पाहून सर्वजण दंग झाले. या जाळ्यात मासे तर अडकले नाहीत मात्र काही बॉक्स त्यांच्या हाती लागले. जेव्हा त्यांनी हे बॉक्सेस उघडून पाहिले तर त्यात अनेक छोटे बॉक्सेस होते. त्यावर Apple चा लोगो होता. सुरुवातीला हे बॉक्स रिकामे असतील असं त्यांना वाटतं. परंतु जेव्हा ते उघडले तेव्हा सर्वजण हैराण झाले.
टिकटॉकवर व्हिडीओ शेअर
या घटनेनंतर हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करत मच्छिमारानं सांगितले की, असं नशीब पालटलं, या प्रकाराची माहिती मिळताच प्रत्येक जण हैराण झाला. या बॉक्समध्ये ठेवलेले प्रॉडक्ट्स पाण्यामुळे खराब झाले नाहीत. या बॉक्सची पॅकिंग इतक्या चांगल्या पद्धतीने केली होती की, त्यामुळे आतमधील मालाचं कुठलंही नुकसान झालं नव्हतं. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रॉडक्ट पाण्यामुळे खराब झाले असतील अशी शंका वर्तवली परंतु मच्छिमारानं त्यावर उत्तर दिलं. या बॉक्समध्ये कुठेही पाणी गेले नव्हतं. पॅकिंग चांगली असल्याने आतील माल खराब झाला नव्हता असं त्याने सांगितले.
यापूर्वीही असाच प्रकार अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे समोर आला होता. ज्याठिकाणी एक व्यक्ती त्याच्या मित्रांसोबत समुद्रात गेला असता त्याला पाण्यावर अनेक पॅकेट्स तरंगताना दिसले होते. या सर्व पॅकेटमध्ये एकूण ३० किलो कोकेन होतं. ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत जवळपास साडे सात कोटी रुपये होती.