‘बोट जंपिंग चॅलेंज’च्या नादात चौघांचा जीव गेला; या ट्रेंड्सना दूरच ठेवणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 05:31 AM2023-07-12T05:31:34+5:302023-07-12T05:31:56+5:30
या चॅलेंजमध्ये लोक वेगवान बोटीतून पाण्यात उलटी उडी घेतात आणि त्याचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात.
स्वतःला वेगळे किंवा कूल दाखविण्यासाठी सोशल मीडियावरील विविध ट्रेंडमध्ये तरुणाई भाग घेते आणि हाच ट्रेंड कधी कधी त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो. आता टिकटॉकवरील अशाच एका व्हायरल ‘बोट जंपिंग चॅलेंज’मुळे अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांत चार मृत्यू झाल्याचे वृत्त द इंडिपेंडंटने दिले आहे.
या चॅलेंजमध्ये लोक वेगवान बोटीतून पाण्यात उलटी उडी घेतात आणि त्याचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. यामुळे राज्यात चारजणांचे “सहज टाळता येण्याजोगे” बुडून मृत्यू झालेत. ही खूप मोठी चिंतेची बाब आहे, कारण गेल्या दोन वर्षांत आम्ही हा पॅटर्न उदयास येताना पाहिला आहे. हा ट्रेंड तुरळक असला तरी यापासून दूर राहणे आणि अशा ट्रेंड्सना दूरच ठेवणे आवश्यक आहे, असे अलाबामाच्या चिल्डर्सबर्ग बचाव पथकातील जिम डेनिस यांनी सांगितले.
पहिली घटना फेब्रुवारीत घडली. बोटीत बसलेल्या पत्नी आणि तीन लहान मुलांसह व्हायरल चॅलेंजचा प्रयत्न करताना एका वडिलांचा मृत्यू झाला. “दुर्दैवाने, पत्नीने पतीचा मृत्यू चित्रित केला” असे डेनिस यांनी सांगितले. चॅलेंजमध्ये मृत्युमुखी पडलेले सर्व पुरुष होते. अधिकाऱ्यांनी प्रियजनांना जीवघेण्या चॅलेंजचा प्रयत्न न करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, टिकटॉकवरील चॅलेंजमुळे जीव गमावल्याची ही पहिलीच घटना नाही, अलीकडेच ऑस्ट्रेलियातील एका मुलीचा (१३) ‘क्रोमिंग’ ट्रेंडमुळे मृत्यू झाला होता.