ऑस्ट्रेलियातल्या गावात मिळतोय ‘फुकट’ प्लॉट; फक्त एक युरोमध्ये घर, जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:39 AM2021-11-02T09:39:01+5:302021-11-02T09:39:13+5:30

क्विल्पी या गावात म्हटलं तर एकच त्रुटी आहे. या गावाचं तापमान उन्हाळ्यात काहीवेळा ११३ डिग्री फॅरनहिटपर्यंत जातं, पण इथलं निसर्गसौंदर्य अतिशय विलोभनीय आहे. 

A 'free' plot is available in a village in Australia | ऑस्ट्रेलियातल्या गावात मिळतोय ‘फुकट’ प्लॉट; फक्त एक युरोमध्ये घर, जाणून घ्या... 

ऑस्ट्रेलियातल्या गावात मिळतोय ‘फुकट’ प्लॉट; फक्त एक युरोमध्ये घर, जाणून घ्या... 

googlenewsNext

जगभरात जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपलं स्वत:चं घर असावं. त्यासाठी लोक काहीही करायला  तयार होतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक सर्वसामान्य लोकांना घर घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे काही दशकांपूर्वी अनेकांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून घर घेण्याचा, बांधण्याचा विचार केला, आपल्या आयुष्याची सगळी पुंजी खर्च केली आणि घर घेतलं. आताही घर घेणं सोपं नाहीच. कर्ज मिळणं तुलनेनं खूप सोपं झालं असलं, तरीही लोन घेऊन स्वत:चं घर बांधणं, घेणं ही आजही तितकीच मुश्किलीची गोष्ट आहे. कारण जमिनींचे गगनाला भिडलेले भाव, घरांच्या किमती इतक्या वाढल्यात की अनेक सर्वसामान्य लोकांना स्वत:चं घर असण्याची इच्छा आपल्या मनातच कोंडावी लागते.

पण कोणी जर तुम्हाला सांगितलं, आमचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे, कोरोनाचा शिरकावही तिथे झालेला नाही, कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त आणि संस्कृतीनंही सुपीक, संपन्न असलेल्या आमच्या या गावात राहायला या, त्यासाठी आम्ही तुम्हाला फुकट जमीन देऊ.... साहजिकच लोकांच्या त्यावर उड्या पडतील.
अशीच एक आश्चर्यकारक घटना ऑस्ट्रेलियातील ‘‘क्विल्पी’’ या गावात घडली आहे. निसर्गानं वेढलेलं अत्यंत सुंदर असं हे गाव. या गावाची लोकसंख्या आहे केवळ ८०० ! पण कमी लोकसंख्येमुळे इथल्या लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. याशिवाय डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, मेकॅनिक, व्यापारी... अशा अनेक व्यावसायिकांची इथे कमतरता आहे. गावकऱ्यांची आणि व्यावसायिकांची संख्या वाढावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून इथलं प्रशासन प्रयत्न करीत आहे; पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे यंदा त्यांनी एक अभिनव योजना जाहीर केली. ज्या कोणाला येथे राहायला यायचं असेल, त्याला मोफत जमीन मिळेल! तिथल्या सिटी काऊन्सिलचे प्रमुख जस्टीन हँकॉक यांच्या डोक्यातून ही भन्नाट कल्पना निघाली. त्यांना वाटलं होतं, या स्कीममुळे किमान पाच कुटुंबं जरी इथे राहायला आली, तरी फार झालं! पण त्यांचा अंदाज खोटा ठरला. ही योजना जाहीर झाल्याबरोबर सोशल मीडिया, इंटरनेटवरही ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. 

आश्चर्य म्हणजे ऑस्ट्रेलियातील क्विल्पीच्या आसपासची शहरं तर जाऊच द्या, पण भारत, ब्रिटन, हाँगकाँग, न्यूझीलंड, युरोप आदी देशांतूनही लोकांनी या ठिकाणी घर बांधण्यास उत्सुकता दाखवली. केवळ आठवडाभरातच देश-विदेशातील तब्बल ३५० पेक्षा जास्त लोकांनी क्विल्पीत राहायला येण्याची तयारी दाखवली. 
या योजनेच्या दोनच प्रमुख अटी आहेत. क्विल्पी येथे घर बांधल्यानंतर त्या व्यक्तीनं किमान सहा महिने तरी तिथे राहिलं पाहिजे आणि ती व्यक्ती ऑस्ट्रेलियाची नागरिक असली पाहिजे. 
सिटी काऊन्सिलला त्यामुळे साहजिकच परदेशी व्यक्तींना नकार द्यावा लागला. ज्या व्यक्तीला इथे राहायला यायचं असेल, त्या व्यक्तीला फक्त सुरुवातीला १२,५०० डॉलर भरावे लागतील. सहा महिने ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय जर तिथे राहिले तर ‘डिपॉझिट’ म्हणून घेतलेली ही रक्कम त्यांना परत मिळेल! 

क्विल्पी या गावात म्हटलं तर एकच त्रुटी आहे. या गावाचं तापमान उन्हाळ्यात काहीवेळा ११३ डिग्री फॅरनहिटपर्यंत जातं, पण इथलं निसर्गसौंदर्य अतिशय विलोभनीय आहे. 
वन्य प्राणीही इथे बऱ्याचदा पाहायला मिळतात. कांगारुंसारखे प्राणी तर शाळेच्या प्रांगणात खेळताना दिसतात. क्विल्पीचं ‘प्रलोभन’ इथेच संपत नाही. क्विल्पीच्या सिटी काऊन्सिलनं इथे राहायला येणाऱ्यांना स्विमंग पूलमध्ये फ्री प्रवेश, २४ तासात केव्हाही जाता येऊ शकेल अशी जिम, दोन ग्रोसरी स्टोअर्स, तलावाची उपलब्धता... अशा अनेक सुविधा देऊ केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये जमिनीचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात निसर्गरम्य, मोकळ्या वातावरणात घर मिळण्याची, मोकळा परिसर असण्याची शक्यता कमीच. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी ही कल्पना लगेच उचलून धरली. रोबिना मिहान या महिलेनं १२,५०० डॉलरमध्ये जमीन मिळणार हे कळताच तिथे प्लॉट घेऊनही टाकला. ती म्हणते, मी जेव्हा ही ऑफर स्वीकारली, तेव्हा तर हे पैसे आपल्याला परत मिळणार आहेत, हेही मला माहीत नव्हतं! 
टॉम हेन्सी आणि त्याची प्रेयसी टेसा मॅकडॉल यांनीही क्विल्पी येथे प्लॉट घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे, अशा ठिकाणी राहाणं, आपलं फॅमिली लाईफ सुरू करणं आणि तिथेच आपली मुलं वाढवणं यापेक्षा अधिक रोमँटिक कल्पना दुसरी कुठली असूच शकत नाही.

फक्त एक युरोमध्ये घर! 
अलीकडेच इटलीमधील काही निसर्गरम्य शहरं आणि गावांनी आपापल्या ठिकाणांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एक अफलातून योजना आणली होती. या ठिकाणी जी घरं अतिशय जीर्ण, पडकी आणि राहण्याच्या लायकीची नव्हती, ती घरं प्रशासनानं केवळ एक युरोमध्ये विकायला काढली. अट फक्त एकच, ही घरं पाडून तिथे चांगली, देखणी, भक्कम घरं बांधायची! या योजनेनंही आंतरराष्ट्रीय स्तरावर सनसनाटी निर्माण केली होती.

 

Web Title: A 'free' plot is available in a village in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.