"माझं डेथ सर्टिफिकेट हरवलंय...", जाहिरात पाहून लोक म्हणाले...या देशात काहीही शक्य आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:17 AM2022-09-21T09:17:49+5:302022-09-21T09:18:13+5:30
आता कोणत्याही व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट तेव्हाच बनतं जेव्हा त्याचा मृत्यू झालेला असतो. काही वेळा असंही दिसून आलंय की लोक जिवंत असतात, पण सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांना मृत घोषित केलेलं असतं.
आता कोणत्याही व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट तेव्हाच बनतं जेव्हा त्याचा मृत्यू झालेला असतो. काही वेळा असंही दिसून आलंय की लोक जिवंत असतात, पण सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांना मृत घोषित केलेलं असतं. अशा परिस्थितीत लोकांना स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नुकतंच हरियाणामध्ये एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये १०२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर सरकारकडून वृद्धापकाळाची पेन्शन बंद करण्यात आली होती. त्यानंतर तो जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी अनोख्या अंदाजात प्रशासकीय ऑफिसमध्ये पोहोचला. पण सध्या सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर जाहिरात व्हायरल होत आहे.
व्हायरल जाहिरातीत एका व्यक्तीनं मृत्यू प्रमाणपत्र हरवल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यानं आपलं प्रमाणपत्र केव्हा आणि कुठे हरवलं हे ठिकाण आणि वेळही सांगितलं आहे. ही जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि लोक त्याचा आनंदही घेत आहेत. "७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० च्या सुमारास लुमडिंग बाजार येथे माझं मृत्यू प्रमाणपत्र हरवलं आहे', असं जाहिरातीत लिहिलेलं दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या जाहिरातीत प्रमाणपत्राचा नोंदणी क्रमांक आणि अनुक्रमांकही लिहिलेला आहे. ही जाहिरात रणजीत कुमार चक्रवर्ती यांच्या नावानं प्रकाशित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीनं मृत्यू प्रमाणपत्र हरवल्याचा दावा केला आहे, तोच आहे.
मजेशीर जाहिरात आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केली असून, 'हे फक्त भारतातच घडू शकतं', असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. नेटिझन्सना मात्र जाहिरात खूप आवडलेली दिसतेय आणि विविध मजेदार प्रतिक्रिया त्यावर येत आहेत. एका यूजरनं 'देशात काहीही शक्य आहे', असं लिहिलं आहे.