दिवसा अभ्यास अन् रात्री फूड डिलिव्हरी; पोरीच्या जिद्दीला सलाम, जिंकली अनेकांची मनं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:18 PM2022-08-01T16:18:21+5:302022-08-01T16:21:57+5:30
पाकिस्तानात राहणारी मीराब हिची कहाणी सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे. मीराब रात्री फास्ट फूड कंपनी KFC साठी फूड डिलिव्हरीचं काम करते आणि दिवसा ती महाविद्यालयीन अभ्यास करते.
नवी दिल्ली-
पाकिस्तानात राहणारी मीराब हिची कहाणी सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे. मीराब रात्री फास्ट फूड कंपनी KFC साठी फूड डिलिव्हरीचं काम करते आणि दिवसा ती महाविद्यालयीन अभ्यास करते.
मीराब ही फॅशन डिझाइनिंगमधून पदवीचं शिक्षण घेत आहे. स्वत:चा फॅशन ब्रँड लॉन्च करण्याचं तिचं स्वप्न आहे. मीराबच्या जिद्दीचं सोशल मीडिया युझर्स कौतुक करत आहेत. मीराब हिची कहाणी लाहोरची रहिवासी असलेल्या फिजा इजाज यांनी त्यांच्या लिंक्डिन अकाऊंटवर गेल्या आठवड्यात शेअर केली होती. फिजा या युनिलीव्हर कंपनीत ग्लोबल ब्रँड लीड पदावर कार्यरत आहेत. फिजा यांनी आपल्या पोस्टमध्ये मीराबशी झालेला संवाद कथन केला आहे. तिचं काम, बाइक चालवण्याची कला आणि तिच्या आवडीनिवडी याबाबत फिजा यांनी मीराबशी गप्पा मारल्या.
फिजा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केएफसीमधून एक फूड डिलिव्हरी ऑर्डर केली होती. ऑर्डर केल्यानंतर त्यांना कॉल आला आणि समोरुन आवाज मुलीचा होता. एक मुलगी इतक्या रात्री फूड डिलिव्हरी घेऊन येतेय हे ऐकूनच फिजा यांना मीराब हिला भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. फिजा आपल्या मित्रमंडळींसोबत घराबाहेर आल्या आणि मीराबची वाट पाहात होत्या. मीराब आल्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ गप्पा झाल्या.
फिजा यांनी केलेल्या पोस्टनुसार मीराब लाहोर येथील युहानाबादची रहिवासी आहे. ती फॅशन डिझाइनिंगमध्ये पदवीचं शिक्षण घेत आहे. केएफसीमध्ये ती नाइट ड्युटी करते. तीन वर्ष ती हे काम करणार आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण झालं की मीराबला स्वत:चा फॅशन ब्रँड लॉन्च करायचा आहे, असंही फिजा यांनी म्हटलं आहे.
मीराब हिचा शिक्षणाचा खर्च एक संस्था करत आहे. पण आपल्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी आणि इतर खर्चासाठी मीराब नाइट ड्युटीत फूड डिलिव्हरीचं काम करते. तर सकाळी ती पूर्णवेळ तिच्या अभ्यासाला देते. मीराबच्या जिद्दीचं कौतुक होत असताना केएफसीच्या पाकिस्तान युनिट पीपल चीफ ऑफीसर असमा युसूफ यांनीही फिजा यांची पोस्ट वाचली आणि त्यावर कमेंट केली. मीराबची कहाणी सांगितल्याबद्दल असमा युसूफ यांनी फिजा यांचे आभार मानले आहेत. तसंच मीराब हिच्या शिक्षणाचा खर्च केएफसी फीमेल हायर एज्युकेशन स्कॉलरशीप प्रोग्राम अंतर्गत केला जात असल्याचंही त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं.