'आम्ही आमचा बाप गमावलाय'; नाशिकच्या मुलीनं Video शेअर करत सांगितलं, कोरोनाला हलक्यात घेऊ नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:18 PM2020-09-07T20:18:20+5:302020-09-07T20:28:06+5:30
एका मोठ्या रुग्णालयाने ICU बेड उपलब्ध आहे असं सांगत वाट पाहायला लावली आणि शेवटच्या क्षणाला आमच्याकडे आता बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं.
कोरोनाच्या माहामारीनं जगभरात कहर केला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी गंभीर प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. कोरोनाचा सामना करत असताना वेदनादायक प्रसंगांना तोंड दिलेल्या एका मुलीनं सोशल मीडियावर आपला व्हिडीओ शेअर केला आहे. Corona रुग्णांचे उपचार करण्यासाठी रुग्णालयं उपलब्ध असल्याचे दावे केले जातात. कुठे आहेत ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णालयं? सर्वसामान्यांची ICU बेड मिळवण्यासाठी फरपट होत आहे. याउलट राकारणी मंडळी आणि सेलिब्रिटींना लगेचं रुग्णायलात सेवा पुरवल्या जात आहेत? असा प्रश्न या वडिलांना गमावलेल्या तरूणीनं उपस्थित केला आहे.
व्हिडीओमधील ही मुलगी नाशिकची रहिवासी असून रश्मी पवार असं तिचं नाव आहे. तीचे बाबा एका फार्मास्युटिकल कंपनीत कामाला होते. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्याने ऑक्सिजनची सोय असलेल्या रुग्णालयात अॅडमिट व्हायची वेळ आली. त्यानंतर कुटुंबीयांची धडपड सुरू झाली. एका मोठ्या रुग्णालयाने ICU बेड उपलब्ध आहे असं सांगत वाट पाहायला लावली आणि शेवटच्या क्षणाला आमच्याकडे आता बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं.
"पेशंटला बेड शोधून देणं हे आमचं काम नाही. तुमचं तुम्ही बघा", असं कुटुंबीयांना सांगण्यात आलं. बेड मिळवण्यासाठी कशी वणवण करावी लागली हे रश्मीनं सांगितले आहे. सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात असा संतप्त सवाल तिने या पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. घरी उपचार शक्य असणारेही रुग्णालयातली जागा अडवतात आणि त्यामुळे खरी गरज असणाऱ्या सामान्यांना जीव गमवावा लागतो'' असं रश्मीने म्हटलं आहे.
अखेर खूप धावपळ केल्यानंतर रश्मीच्या वडिलांना एका रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला. पण रुग्णाला आवश्यकता असलेली ऑक्सिजन लेव्हल ठेवण्याएवढी क्षमता तिथे नव्हती. म्हणून चांगल्या रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडसाठी वणवण सुरू झाली. अशा अवस्थेत तिचे वडील अखेर रुग्णालयात दाखल झाले, अखेर कोविडविरुद्धची लढाई 21 दिवस लढूनही ते हरले. ''वेळेत ICU बेड मिळाला असता, तर आज ते आमच्यात असते. आम्ही आमचा बाप गमावला. ही वेळ कुणावरही येऊ शकते,'' म्हणून कोरोनाला घाबरू नका पण हलक्यातही घेऊ नका, असं आवाहन रश्मीनं या व्हिडीओच्या माध्यामातून केलं आहे.
हे पण वाचा
नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण
महिला पेटवत होती मेणबत्ती, हॅंड सॅनिटायजरमुळे अचानक झाला स्फोट आणि...