धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:41 PM2024-12-02T16:41:24+5:302024-12-02T16:42:45+5:30
Guinea Football fight: रुग्णालयात मृतदेहांचा ढीग, संतप्त चाहत्यांनी पोलिस स्टेशनही दिलं पेटवून
Guinea Football fight Video: पश्चिम आफ्रिकेतील गिनी या देशात एक मोठी दुर्घटना घडली. एका फुटबॉल सामन्यात चाहते आपसात भिडले. या दुर्घटनेत तब्बल १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्थानिक रुग्णालयाच्या सूत्रांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, गिनी या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या एनजेरेकोर येथे फुटबॉल मॅच सुरु होती. या सामन्यादरम्यान चाहत्यांशी एकमेकांशी हाणामारी झाली आणि त्यात खूप लोक मारले गेले. तेथील एका डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, सरकारी रुग्णालयात लांबच्या लांब मृतदेहांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. शवागरे तुडुंब भरल्याने काही मृतदेह रुग्णालयाच्या गल्लीतही पडलेले दिसले.
पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ-
#Alerte/N’zérékoré : La finale du tournoi doté du trophée « Général Mamadi Doumbouya » vire au dr.ame… pic.twitter.com/fjTvdxoe0v
— Guineeinfos.com (@guineeinfos_com) December 1, 2024
मृतदेहांचा खच, पोलिस स्टेशन दिलं पेटवून
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एएफपीने देखील हा व्हिडीओ खरा असल्याची पुष्टी केलेली नाही. पण त्या व्हिडीओमध्ये मॅचच्या बाहेर रस्त्यावर चाहते एकमेकांना हाणामारी करताना आणि काही मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत स्पष्ट दिसून येत आहेत. काही साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या संतप्त आंदोलनकर्त्यांनी एनजेरेकोरे पोलिस ठाण्यातही तोडफोड केली आणि आग लावली.
एका आंदोलनकर्त्याने सांगितले की, हा सगळा राडा रेफरीच्या एका वादग्रस्त निर्णयानंतर सुरु झाला. त्यानंतर चाहत्यांनी मैदानात घुसून हल्लाबोल केला. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, ही फुटबॉल मॅच गिनी मधील जुंटा नेता ममादी डौंबौया यांच्या सन्मानार्थ भरवण्यात आलेल्या टुर्नामेंटचा एक भाग होती. २०२१ मध्ये डौंबौया यांनी तत्कालीन गिनी सरकार उलथवून लावले आणि त्याजागी स्वत: राष्ट्राध्यक्ष होऊन सरकार स्थापन केले.