वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करा, अन्यथा माझा संसार मोडेल; कर्मचाऱ्याच्या पत्नीची हर्ष गोयंकांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 05:33 PM2021-09-11T17:33:38+5:302021-09-11T17:34:40+5:30
कर्मचाऱ्याच्या पत्नीचं मालकांना लय भारी पत्र; सोशल मीडियावर पत्राची चर्चा
मुंबई: उद्योगपती हर्ष गोयंका कायम त्यांची ट्विट्स कायम चर्चेत असतात. चालू घडामोडींवर गोयंका कायम ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करतात. गुरुवारीदेखील गोयंका यांनी असंच एक ट्विट केलं. त्यांच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. गोयंका यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पत्नीनं गोयंका यांना लिहिलेलं लेटर त्यांनी ट्विट केलं आहे. वर्क फ्रॉम होमशी संबंधित या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
देशातील ख्यातनाम उद्योजकांपैकी एक असलेल्या हर्ष गोयंका यांनी त्यांना त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं पाठवलेलं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. या पत्राला मी काय उत्तर देऊ, असा सवाल त्यांनी विचारला आहे. गोयंका यांना पाठवण्यात आलेलं पत्र मजेशीर आहे. 'डियर सर, मी तुमच्याकडे काम करत असलेल्या मनोजची पत्नी आहे. आता वर्क फ्रॉन ऑफिस सुरू करावं अशी विनंती मी तुम्हाला करते. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि ते कोविड प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल्सचं पूर्णपणे पालन करतात,' असं कर्मचाऱ्याच्या पत्नीनं पत्रात म्हटलं आहे.
Don’t know how to respond to her….😀 pic.twitter.com/SuLFKzbCXy
— Harsh Goenka (@hvgoenka) September 9, 2021
'वर्क फ्रॉम होम आणखी काही कालावधीसाठी सुरू असल्यास आमचा संसार मोडेल. ते दिवसातून दहावेळी कॉफी पितात. वेगवेगळ्या रुममध्ये असतात. सगळं सामान अस्तावस्त करून टाकतात. खाण्यासाठी सारखं काही ना काही मागत असतात. मी त्यांना कामाच्या वेळेत सुरू असलेल्या कॉल्सदरम्यान झोपलेलंदेखील पाहिलं आहे. मला आधीच दोन मुलं आहेत. मला त्यांची काळजी घ्यायची असते. कृपया माझी मदत करा,' असं संबंधित महिलेनं पत्रात नमूद केलं आहे.