गुगलने स्टार परफॉर्मर बनलेल्या तरुणाला नोकरीवरून काढले, सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 08:33 PM2023-02-28T20:33:06+5:302023-02-28T20:33:43+5:30
गुगलने काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये हैदराबाद येथील हर्ष विजयवर्गीय यांचा समावेश आहे, जे 'स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ' देखील होते.
गेल्या काही महिन्यांत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जवळपास 12 हजार कर्मचारीही काढले आहेत. गुगलने कर्मचाऱ्यांना डेस्क शेअर करण्यास सांगितले होते, जेणेकरून ऑफिस कमी जागेत चालवता येईल. दरम्यान, गुगलने काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये हैदराबाद येथील हर्ष विजयवर्गीय यांचा समावेश आहे, जे 'स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ' देखील होते. हर्ष यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निराशा व्यक्त करत हर्ष यांने लिहिले आहे की, "मला कंपनीकडून एक मेल आला आहे, ज्यामध्ये मला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मला या कंपनीत काम करताना खूप आनंद झाला. मला खूप अभिमान वाटायचा, पण 'माझा पहिला प्रश्न होता 'मी का'?, जेव्हा मी महिन्याचा स्टार परफॉर्मर होतो, मग मी का? आणि याचे उत्तर काहीच नव्हते." दरम्यान, हर्ष विजयवर्गीय यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याचबरोबर, पोस्टमध्ये हर्ष यांनी लिहिले आहे की, नोकरी गेल्याने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप परिणाम झाला आहे. मला पाच दिवस ऑफिस असायचे आणि ऑफिसला जायची सवय होती, आता मी घरी आहे. मला एक मूल आणि पत्नी आहे, जी नेहमी माझ्यासोबत असते. गेल्या दोन महिन्यांपासून मला अर्धा पगार मिळत होता, त्याचा माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे. यानंतरही अचानक कंपनीतून काढून टाकल्याचा मेल आल्याने मी हैराण झालो.
दरम्यान, हर्ष विजयवर्गीय यांनी सांगितले की, ते स्टार परफॉर्मर होता, तरीही त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, लवकरच तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तर दुसर्या युजरने लिहिले की, आजकाल नोकरीची शाश्वती नाही, जेव्हा स्टार परफॉर्मरला काढून टाकले जाते, तेव्हा कोण टिकेल?
यापूर्वी गुगलने जवळपास 12000 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे ही कपात करण्यात आली आहे. यासोबतच, या कपातीची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. कंपनीच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने नोकरी गमावलेल्यांना पगार देण्याचे आश्वासनही दिले आहे.