चालत्या कारमधून त्याने उडवले दीड कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:34 PM2023-04-24T13:34:42+5:302023-04-24T13:35:15+5:30
याच दरम्यान, काहींनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले
अमेरिकेत एका व्यक्तीने चालत्या गाडीतून नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात केली. त्याने एक-दोन नव्हे तर दीड कोटींहून अधिक रुपये हवेत उडवले. दुसऱ्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं म्हणून असं केल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. अमेरिकेच्या ऑरिगनमध्ये ही घटना घडली. चालत्या कारमधून नोटा फेकणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीचे नाव कॉलिन डेव्हिस मॅक्कार्थी असे आहे. कॉलिनने कारच्या खिडकीतून जवळपास दोन हजार डॉलर्स (१ कोटी ६३ लाखांपेक्षा जास्त) रोख रक्कम फेकून दिली होती. त्याने नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात करताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी ते घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
याच दरम्यान, काहींनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून कॉलिनला अडवले आणि नोटांचे बंडल ताब्यात घेतले. कॉलिन आणि त्याच्या पालकांचे जॉइंट बँक अकाउंट असल्याचे सांगण्यात आले. या खात्यातून त्यांनी पैसे काढले होते. पैसे घेऊन तो गाडीत बसला आणि नंतर हायवेकडे निघाला. कॉलिनने चालत्या गाडीची खिडकी उघडली आणि नोटांचे एक एक बंडल हवेत उडू लागले. अनेक मार्गावरून जाणाऱ्यांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. यावेळी सुदैवाने अपघात झाला नाही. पोलिसांनी कॉलिनवर गुन्हा दाखल केला आहे. तपास केला जात आहे.