सरत्या वर्षाची ओळख सांगणारा 'वोटी' ठरला कसा?

By Meghana.dhoke | Updated: December 22, 2024 08:44 IST2024-12-22T08:44:47+5:302024-12-22T08:44:58+5:30

२०२४ या वर्षाची ओळख सांगणारा आणि काहीतरी बिनसतं आहे, याचा इशारा देणारा एक शब्द म्हणून तर चर्चेत आहे.

How Oxford University chooses the world most important word of the year | सरत्या वर्षाची ओळख सांगणारा 'वोटी' ठरला कसा?

सरत्या वर्षाची ओळख सांगणारा 'वोटी' ठरला कसा?

मेघना ढोके
संपादक, सखी डिजिटल

खरं तर पृथ्वीने सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली म्हणून माणसांनी आनंद साजरा करत पार्टी-बिर्टी करण्यात काही हशील नसतं! पृथ्वी अनंतकाळ फिरतेच आहे; पण तिची एक प्रदक्षिणा मानवी जीवनात मात्र उलथापालथ घडवू शकते. म्हणून तर वर्ष संपता संपता माणसाच्या मनाला चाळा लागतोच, सरत्या वर्षातल्या आयुष्याचा ताळा करून पाहण्याचा! काही ताळे बरोबर येतात, काही चुकतात. २०२४ या वर्षाची ओळख सांगणारा आणि काहीतरी बिनसतं आहे, याचा इशारा देणारा एक शब्द म्हणून तर चर्चेत आहे. त्याचं नाव 'ब्रेन रॉट'. 'ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर!' या वर्षाची ओळख म्हणून 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'ने हा शब्द निवडून जाहीर केला आणि अनेकांना वाटलं की मेंदूचं कुजणं आपल्याही वाट्याला आलंच आहे. या शब्दाचा अर्थच आहे की, मानवाची मानसिक आणि बौद्धिक क्षमता कुजणे! हातात स्मार्ट फोन आल्यापासून माणसं 'बधी' झाली आणि मेंदू कुजायला लागला. 

विशेषतः तरुण म्हणजेच जेन झी आणि जेन अल्फा यांच्या ऑनलाइन जगात वारंवार वापरला जाणारा हा शब्द पृथ्वीवरच्या सर्वच माणसांच्या मेंदूचं कुजत जाणं सांगू लागला. सगळ्यांना तो शब्द 'आपला' वाटला. हा शब्द 'ऑक्सफर्ड' वाले ठरवतात कसे? अर्थात Word of the year - WOTY ठरतो कसा !


ठरवतं कोण हे वार्षिक शब्द ? 

'ऑक्सफर्ड'चे भाषातज्ज्ञ वर्षभराचा आढावा म्हणून साधारण ६ शब्द अंतिम यादीत घेतात. हे सहा शब्द त्या वर्षभरात विविध क्षेत्रांत, ऑनलाइन-ऑफलाइन जगात भरपूर वापरले गेलेले असतात किंवा अनेक घटना त्या शब्दांभोवती घडलेल्या असतात. 

१) सांस्कृतिक संदर्भ २) वापराची वारंवारता. ३) जागतिक संदर्भ ४) डेटा आणि ट्रेण्ड्स या चार घटकांचा शब्द निवडताना बारकाईने अभ्यास केला जातो. 

त्या शब्दाचा 'मूड' तपासला जातो. तो शब्द लोक काय अर्थानं वापरतात, त्यामुळे त्यांच्या जगण्यात नेमकं काय बदललं आहे, सामाजिक स्तरावर काय बदललं आहे आणि बदलत राहणार आहे, याचा अंदाज घेतला जातो. वर्षभर माणसं जी भावना, कृती, शब्द याभोवती बोलतात किंवा वागतात त्या शब्दाचा विचार वर्षाची ओळख म्हणून केला जातो आणि एक शब्द निवडला जातो. आता तर ऑनलाइन मतदानातूनही शब्दनिवडीत सहभागी केले जाते. ब्रेन रॉट निवडताना ३७,००० लोकांनी मतदान केल्याचे समजते.

हसरी इमोजी ते ब्रेन रॉट !

२०१५ ते २०२४ या साधारण दशकभराचा अंदाज घेतला तर शब्द आणि आपल्या भवतालचं वातावरण कसं बदलत गेलं, याचा सहज अंदाज येईल.

२०१५ : शब्द न निवडता हसरे 'इमोटिकॉन' अर्थात हसरी इमोजी निवडली. 

२०१६ : पोस्ट टुथ हा शब्द त्यावर्षी गाजला. सत्य-असत्याची सीमारेषाच पुसून टाकणारं कथन या शब्दाच्या निमित्तानं आजही चर्चेत आहे. 

२०१७ : युथक्चेक. जगभरात तरुण मुलांचा राजकीय सत्तेविषयीचा उद्रेक हा शब्द सांगतो.

२०१८ : टॉक्सिक : जगभरातल्या तरुण मुलांच्याच नाहीतर सर्वच माणसांच्या जगात या शब्दाचं वर्चस्व तेव्हापासून आहे. नाती ते कार्यालयीन वातावरण, त्रासदायक सगळं टॉक्सिक. 

२०१९ : क्लायमेट इमर्जन्सी या शब्दानं जगभरातच जगण्याची चिंता वाढवली. 

२०२० : यावर्षी एकही शब्द निवडला गेला नाही. कोरोनाकाळात जग होरपळत होतं. 

२०२१ : व्हॅक्स. कोरोनाकाळात व्हॅक्सिनची चर्चा असताना जगभर त्याचा हा शॉर्टफॉर्म चर्चेत राहिला. 

२०२२ : गॉबलिन मोड: कोरोनाकाळानंतर पूर्ववत आयुष्य सुरू झालं तरी अनेकांनी ती जुनी लाइफस्टाइल नाकारली. त्या अर्थानं हा शब्द चर्चेत होता. 

२०२३ : रिझ : सोशल मीडियाच्या काळात अस्सल गुणांपेक्षा इतरांचं लक्ष वेधून घेणारी चमकधमक सरस ठरू लागली. ही चमकच माणसांचा चार्म ठरवू लागली. 

२०२४ : ब्रेन रॉट : मेंदू कुजत जाणारी मानवी जगण्याची व्यथा

Web Title: How Oxford University chooses the world most important word of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.